पाचगाव, वार्ताहर
निर्मल ग्राम पुरस्कार प्राप्त मोरेवाडी परिसरात पेट्रोल पंपासमोर ओढ्यामध्ये कचऱ्याचे ढीग साठले असून, हा कचरा कुजून परिसरात रोगराई पसरण्याची शक्यता आहे.सुमारे वीस हजार लोकसंख्या असलेल्या मोरेवाडी परिसरात उपनगरांची संख्या झपाट्याने वाढत आहे.मोरेवाडी ग्रामपंचायतचे वार्षिक उत्पन्न सुमारे पंचेचाळीस लाख रुपये असताना केवळ तीन घंटा गाड्यांद्वारे ग्रामपंचायत द्वारे घरोघरी जाऊन कचरा गोळा करण्यात येतो.घंटागाडी वेळेत न आल्यामुळे घरात घंटागाडीत टाकण्यासाठी साठवलेला कचरा कुजत असल्यामुळे नागरिक घरातील कचरा रस्त्याकडेला टाकत आहेत.
आर. के. नगर-मोरेवाडी मुख्य रस्त्यावर पेट्रोल पंपासमोर ओढा आहे.या ओढ्यामध्ये तसेच आजूबाजूला कचरा साठलेला आहे.परिसरात पसरलेल्या या कचऱ्यामुळे येथे भटकी जनावरे,कुत्र्यांचा मोठ्या प्रमाणात वावर वाढला आहे.अनेक वेळा ही जनावरे रस्त्यावर आल्यामुळे येथे लहान मोठे अपघात ही घडत आहेत.मोरेवाडी ग्रामपंचायतने कित्येक दिवसात येथील कचऱ्याचा उठाव केलेला नाही.हा कचरा कुजून परिसरात रोगराई पसरण्याची शक्यता आहे.
पावसाळा तोंडावर आला असताना येथील नाल्याची स्वच्छता करणे आवश्यक आहे.अन्यथा पावसाळ्यात हा नाला तुंबून रस्त्यावर पाणी येण्याची शक्यता आहे.असे असताना या नाले सफाईकडेही मोरेवाडी ग्रामपंचायतचे दुर्लक्ष झाले आहे.राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या परिसरातील तरुण कार्यकर्त्यांनी या नाल्या जवळ कचरा टाकू नये असे आवाहन करणारा फलक उभा केला होता. जोपर्यंत हा फलक होता तोपर्यंत नागरिकांनी या ठिकाणी कचरा टाकणे बंद केले. हा फलक खराब झाल्यानंतर पुन्हा या ठिकाणी मोठ्या प्रमाणात कचऱ्याचे ढीग जमा झाले आहेत. निर्मल ग्राम पुरस्कार प्राप्त मोरेवाडी ग्रामपंचायतीने येथील कचऱ्याचा तात्काळ उठाव करावा आणि नालेसफाई करावी अशी मागणी परिसरातील नागरिकांमधून होत आहे.
मोरेवाडी ग्रामपंचायतने तात्काळ कचरा उठाव करावा
आर. के. नगर-मोरेवाडी मुख्य रस्त्यावर असणाऱ्या नाल्या जवळ मोठ्या प्रमाणात कचरा असून तो कुजल्यामुळे परिसरात रोगराई पसरण्याची शक्यता आहे. पावसाळ्यापूर्वी ग्रामपंचायतीने येथील नालेसफाई व कचऱ्याचा उठाव करणे गरजेचे आहे.
ऋषिकेश हुन्नूरे,अध्यक्ष राष्ट्रवादी युवक काँग्रेस, कोल्हापूर दक्षिण मतदार संघ
निर्मल ग्राम पुरस्कार प्राप्त मोरेवाडी ग्रामपंचायतचे कचरा उठावाकडे दुर्लक्ष
आर. के. नगर-मोरेवाडी मुख्य रस्त्याशेजारी नाल्यामध्ये कचरा कुजून दुर्गंधी पसरली आहे. सकाळी या रस्त्यावरून फिरायला येणाऱ्या नागरिकांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे येथून जाताना नागरिकांना नाक मुठीत धरून जावे लागते. ग्रामपंचायतीने तात्काळ येथील कचऱ्याचा उठाव करावा.
अण्णासाहेब मोरे,नागरिक









