अध्याय पंचविसावा
भगवंत उद्धवाला म्हणाले, त्रिगुणांच्या पैकी कोणता तरी एक गुण प्रत्येकात जास्त असतो आणि त्यानुसार त्याचा स्वभाव तयार होतो. त्या स्वभावाला धरून त्याची वर्तणूक आयुष्यभर होत असते. मृत्यूनंतर अशा लोकांचे काय काय होते? त्यांना कोणती गती मिळते? ते सांगतो. सत्वगुण जर वाढला असेल तर मनुष्य उत्तरोत्तर वरच्या लोकांमध्ये जातो. वाढलेला तमोगुण जीवांना वृक्ष इत्यादींपर्यंतची अधोगती प्राप्त करून देतो आणि रजोगुण वाढल्यामुळे मनुष्यशरीर प्राप्त होते.
थोडक्मयात त्यांनी कर्मे करत असताना ज्या प्रकारच्या फळाची अपेक्षा केली असेल त्यानुसार त्यांना पुढील गती मिळते पण जे लोक त्यांच्या स्वभावात कोणत्याही गुणाचे अधिक्मय असले तरी माझी भक्ती करतात त्यांना निरपेक्षपणे स्वधर्म आचरण करण्याचे महत्त्व कळलेले असते. त्यानुसार वागून जे स्वधर्माचे आचरण करून ब्रह्माला अर्पण करतात त्यांचा मी उद्धार करतो. काही लोक स्वधर्माचरण करतात पण ते ब्रह्माला अर्पण करत नाहीत. अशांनाही त्यांच्या स्वधर्माच्या कर्मशक्तीनेच ऊर्ध्वलोकी जावयास मिळते. रजोगुण वाढला म्हणजे जीवाच्या वाटय़ाला पुढील जन्मात कष्टदायक परिस्थिती येते. हातून स्वधर्माचे पालन होत नाही त्यामुळे पुन्हा जन्म, पुन्हा मृत्यु हे सारखे भोगावे लागते. तमोगुण वाढला म्हणजे पश्वादि योनीमध्ये जन्म घेउन डास, माशी, झाडे, दगड इत्यादि सर्व योनी भोगाव्या लागतात.
म्हणून, वाटय़ाला आलेली कर्मे करून ती ईश्वराला अर्पण करणे हे मोठे पुण्याचे काम आहे. असे जो करतो तो कर्म बंधनातून मुक्त होतो. त्याचे मागील व या जन्मातील सर्व पाप धुतले जाऊन शेवटी ईश्वर त्याचा उद्धार करतात. जे इतरांना त्रास व्हावा या उद्देशाने कर्म करतात त्यांना पशु योनीत जन्म घ्यावा लागतो आणि त्यातील सर्व योनीतील भोग भोगावे लागतात. कोणता गुण वाढला की कोणता लोक मिळतो ते ऐक. सत्त्वगुणांच्या वृद्धीत मृत्यू आला असता स्वर्गाची प्राप्ती होते. रजोगुणाच्या वृद्धीत मृत्यू आलेल्याला मनुष्यलोक मिळतो आणि तमोगुणाची वृद्धी असताना ज्याना मृत्यू येतो, त्याला नरकाची प्राप्ती होते परंतु जे माझी भक्ती करतात ते त्रिगुणातीत होत असल्याने त्यांना माझीच प्राप्ती होते. त्यांनी प्रेमाने माझी भक्ती केल्यामुळे त्यांच्या हृदयामध्ये अंतकाळी आत्मतेजाने देदीप्यमान अशी माझी मूर्ती प्रगट होते.
शंख, चक्र, गदा इत्यादि संपूर्ण आयुधे धारण केलेला पीतांबरधारी श्रीकृष्ण ध्यानात आणून जो मरण पावतो, तो वैकुंठामध्ये मत्स्वरूपच होतो. सर्व प्राणिमात्रांच्या ठिकाणी मीच आत्मा परिपूर्ण रूपाने भरलेला आहे. असे ज्याचे भजन अखंड चालू असते, ते जीवंतपणीच तिन्ही गुणांना जिंकून निर्गुणपदाला पोचतात. त्यांच्या देहाला जर दैवयोगाने मरण आले, तर त्यांना माझ्याशिवाय दुसरे स्थानच नाही, ते निजानंदाने परिपूर्ण असल्यामुळे स्वतःच निर्गुणस्वरूप होतात. उद्धवा, माझे निर्गुणस्वरूप किंवा वैकुंठांतील सगुण स्वरूप, ही दोन्ही एकच आहेत.
जेव्हा आपल्या धर्मानुसार, कर्म निष्कामपणे आचरून मला समर्पित केले जाते, तेव्हा ते सात्त्विक होते. ज्या कर्माच्या अनु÷ानामध्ये एखाद्या फळाची अपेक्षा असते, तेव्हा ते राजस होते आणि कर्म करण्यात एखाद्याला त्रास देणे इत्यादी भाव असतो, तेव्हा ते तामसिक होते. उद्धवा! तीन गुणांसह मी तुला सांगितलेली ही त्रिपुटी शून्य करणे हे मनुष्य जन्माचे ध्येय असायला हवे.
वास्तविक पाहता माणसाचा देह ही मायेची निर्मिती असल्याने देह हा त्रिगुणांनी युक्त असतो. त्यामुळे गुण प्राबल्यानुसार त्याचा स्वभाव बनतो. जोपर्यंत त्याचे आयुष्य आहे तोपर्यंत त्याच्या हातून पूर्व प्रारब्धानुसार कर्मे होतच असतात. त्यामुळे कार्य, कर्ता आणि कारण ही त्रिपुटी त्याच्याही चित्तात असतेच. जेव्हा ही त्रिपुटी गुणांसह शून्य होते तेव्हा चैतन्यरूप निर्गुण ज्ञान
राहते.
क्रमशः








