अध्याय पंचविसावा
उद्धवा इतर गोष्टींप्रमाणे तीन गुणांचे सुखही तीन प्रकारचे असते आणि निर्गुणाचे सुख तर अलौकिक आहे. आत्मचिंतनाने प्राप्त होणारे सुख सात्त्विक, विषयांपासून प्राप्त होणारे राजस, मोह आणि दीनतेने प्राप्त होणारे सुख तामस असते. जे सुख माझ्या आश्रयाने मिळणारे ते गुणातीत समजावे. विषयसुखाची स्फूर्ति सोडून देऊन आत्मसुखानेच मनाला आनंदित करणारे सुख खरोखर सात्त्विक होय. विषयापासून मिळणारे सुख तात्पुरते असते आणि शेवटी ते या ना त्या रूपाने दुःखच देते. त्याउलट एकदा आत्मसुख मिळू लागले की, त्याला ओहोट हा शब्द माहित नसतो. राजस माणसाची सुखाची कल्पना वेगळीच असते. त्याला नानाप्रकारच्या विषयांची आवड, विषयसुखाची लयलूट म्हणजे राजसाचे सुख होय. उद्धवा! अत्यंत निंद्य आणि माद चढणारे जे सुख असते, तेच बुद्धीला आवडणे हेच खरोखर तामससुख होय. सात्त्विक, राजस आणि तामस सुखातील फरक मी तुला समजावून सांगितला आता यासगळय़ा पेक्षा वेगळय़ा असलेल्या निर्गुण सुखाबद्दल सांगायचं झालं तर, संपूर्ण निरपेक्ष असलेल्या भक्ताच्या हृदयात माझी मूर्ती प्रगट झाली की, त्याची संसार करण्याची इच्छाच विसरून जाते आणि त्यानंतर जो सुखाचा लाभ होतो, ते सुख खरोखर निर्गुण सुख होय. ज्याप्रमाणे एका धाग्यामध्ये सर्व मणी ओवून सुंदरशी माळ तयार होते. त्याप्रमाणे सर्व प्राणिमात्र माझ्यामध्येच गोवले गेलेले आहेत. सर्वात राहणारा परमेश्वर तो मीच, हे तत्त्व जो ओळखतो तो मझ्याशी एकरूप होतो. त्यामुळे त्याला सर्वांच्यात वसलेला मी, परमेश्वर दिसू लागतो. माझ्याशी ऐक्मय झाल्याने जे सुख प्राप्त होते तेच निर्गुणाचे खरे आत्मसुख होय. एकदा या आत्मस्वरूपाच्या सुखाचे स्वरूप दृष्टीस पडले की, त्याला सतत माझेच ध्यान लागते. सतत करत असलेल्या माझ्या ध्यानामुळे त्याला इतर कशाचीच जाणीव उरत नाही. या सगळय़ाचा परिणाम होऊन, निर्गुणी मनुष्य स्वतःच सुखस्वरूप होतो. पाप आणि पुण्य दोन्ही नष्ट झाले की, हे निर्गुणसुखाचे दीप हाती लागतात. भक्त सर्वांगाने सुखस्वरूप झाला म्हणजे त्याला या आनंदाचा उपभोग घ्यावयास मिळतो. हा निर्गुण सुखाचा मार्ग माझ्या अनन्य भक्तांना सापडलेला असतो. महापूर आला म्हणजे तो नदीनाले असे वेगवेगळे प्रवाह न राखता सर्वकाही एकसारखे करून टाकतो. त्याप्रमाणे निर्गुण सुखही देहाच्या सर्व इंद्रियात भरून राहते. त्यामुळे तो स्वतः परब्रह्म होतो. त्याच्यादृष्टीने समोर सर्व जग दिसत असले तरी त्याच्यादृष्टीने ते असून नसून सारखेच असते. मृगजळात ज्याप्रमाणे पाणी असत नाही, त्याप्रमाणे परब्रह्माच्या ठिकाणी प्रपंचाचा मागमूसही असत नाही. प्रपंचातून मिळणारे सुख तात्पुरते असते. त्यामुळे ते कधी ना कधी संपते. त्यामुळे प्रपंचातले सुख शेवटी दुःखदायकच असते. संतमंडळी सांगतात त्याप्रमाणे प्रपंचातून मिळणारे सुख म्हणजे दुःखानी घेतलेला सुखाचा वेश होय, त्याउलट परब्रह्मातून मिळणारे सुख कधीही न संपणारे असते. तेच निर्गुण सुख होय. या सुखाला मर्यादा म्हणून कधी घालताच येत नाही. म्हणून निर्गुणी भक्त सदासर्वकाळ सुखस्वरूप होऊन राहतो. निर्गुणाची कधीही न संपणारी सुखसंपदा हेवा करण्यासारखीच असते. त्रिगुण आणि निर्गुण ह्यातील निरनिराळे फरक श्रीहरिंनी दाखवून दिले. आता शेवटी त्याचा थोडक्मयात परामर्श ते घेत आहेत. ते म्हणतात, वस्तू, स्थान, फल, काल, ज्ञान, कर्म, कर्ता, श्रद्धा, अवस्था, निरनिराळी शरीरे आणि नि÷ा ही सर्व मायेचीच निर्मिती असल्याने त्रिगुणात्मकच आहेत. सर्व संसार तीन गुणांनीच भरलेला आहे. ह्यात निर्गुण असा एक मीच. हे रहस्य तुला कळण्याकरिता मी गुणांचे निरूपण केले. मी हे वारंवार का सांगतो आहे असे तुझ्या कदाचित मनात येत असेल पण हे इतके सविस्तर सांगायचे कारण म्हणजे आपण गुणानी युक्त आहोत आणि त्यातून आपल्याला बाहेर पडायचे आहे हेच बहुतेकांच्या लक्षात येत नाही. हे अज्ञान दूर व्हावे, मनात कुठलीही शंका राहू नये म्हणून मी हे पुनःपुन्हा सांगत आहे. आपण जे जे पहातो, ऐकतो किंवा ज्याचे ज्याचे चिंतन करतो, ते ते सारेच मायेच्या गुणांच्या कार्याने त्रिगुणात्मकच झालेले आहे, असे समजावे.
क्रमशः








