अध्याय अठ्ठाविसावा
भगवंत म्हणाले, उद्धवा प्रत्येकाला असे वाटत असते की, माझ्या संसारातल्या सगळ्या गोष्टी मीच घडवून आणतो. ह्यालाच देहाभिमान म्हणतात. आपल्या मनासारख्या सर्व गोष्टी घडवून आणणे ही आपलीच जबाबदारी आहे असे वाटून त्यांची सदैव यश प्राप्त करून घेण्यासाठी धडपड चालू असते. त्यातूनच इष्टानिष्ट कर्मांच्या राशी तो पाडत असतो. ह्या जन्ममरणाच्या चक्रातून सुटका होण्यासाठी काय करावे ते मी आता तुला सांगतो ऐक, मी कर्ता आहे ह्या कल्पनेतून निर्माण होणाऱ्या दु:खदायक देहाभिमानाची समूळ ओळख करून घ्यावी. ह्या देहाभिमानामुळे आत्तापर्यंत मी किती भ्रमल्यासारखा वागत होतो हे लक्षात घेऊन पश्चात्ताप झाल्यावर त्याचे निर्दालन करण्यासाठी प्रयत्न करावेत. त्यासाठी सद्गुरुना शरण जाऊन ज्ञानखड्गाची प्राप्ती करून घ्यावी. त्यासाठी सद्गुरूंच्या उपदेशाचे मन:पूर्वक ग्रहण करून मनन करावे. ज्याप्रमाणे सहाणेवर घासून शस्त्राला धारदार बनवतात, त्याप्रमाणे सद्गुरूंच्या उपदेशाच्या सहाणेवर त्यांच्या मनातले विचार घासून त्यांचे तंतोतत पालन करावे. त्यातून प्रखर असे ज्ञानखड्ग प्राप्त करून घ्यावे. असे ज्ञानखड्ग प्राप्त झालेल्या शिष्यांनी देहाभिमान समूळ छेदून टाकलेला असतो. त्यामुळे उरलेले आयुष्य ते निराभिमानाने आणि सद्गुरूंच्या विचारांशी निष्ठा ठेऊन व्यतीत करतात. त्यांना इच्छा, निंदा, द्वेष, तृष्णा बिलकुल त्रास देत नाहीत. सद्गुरूंच्या कृपेने ज्ञानखड्ग प्राप्त झाल्याने त्यांनी त्यांचे मन आणि बुद्धी ईश्वराला अर्पण केलेली असते. त्यामुळे त्याच्या इच्छेचा व तृष्णेचा संपूर्ण निरास झालेला असतो. उद्धवाने भगवंतानी सांगितलेले सगळे लक्षपूर्वक ऐकले. सद्गुरुकृपा, ज्ञानखड्ग, निराभिमान, निष्ठा ह्या एक एक गोष्टींचा भगवंतानी सविस्तर उलगडा केला तर बरं होईल असे त्याला वाटू लागले. त्याच्या मनातली इच्छा जाणून भगवंत म्हणाले, आत्मोद्धारासाठी ज्या गोष्टी आवश्यक आहेत त्याबाबत माहिती घेणे हे खरे ज्ञान होय. ह्यालाच आत्मज्ञान किंवा चोख ज्ञान असेही म्हणतात. त्यामध्ये नित्यानित्यविवेकाचा समावेश होतो. नित्य म्हणजे कायम टिकणारी वस्तू तर अनित्य म्हणजे नाश पावणाऱ्या वस्तू होत. नित्य वस्तू एकच आहे ती म्हणजे आत्मतत्व किंवा निर्गुण, निराकार परमेश्वर. इतर सर्व नजरेसमोर दिसणाऱ्या गोष्टी नाशवंत आहेत. कल्पांती ह्या सगळ्याचाच नाश होऊन प्रलय होतो. अर्जुनाला भगवद्गीता सांगताना सुद्धा मी ह्या कल्पांती काय होतं ह्याचा स्पष्ट उल्लेख केलेला आहे, तो असा, कल्पांती निजवी भूते मी माझ्या प्रकृतीमधे । कल्पारंभी पुन्हा सारी मी चि जागवितो स्वये? आत्मा हा कधीही नष्ट न होणारा असल्याने तो देहाला नित्य प्रकाश देत असतो. आत्म्याला ज्ञाते लोक ईश्वराचा अंश मानतात आणि तो सर्व देहात सारखाच असतो. ज्याप्रमाणे कोणताही ऊस पिळला तरी त्यातून स्वादमधुर रस मिळतो आणि तो आटवला की, त्यातील मळी बाजूला होऊन साखर मिळते किंवा केळी आणि नारळ यातही गोडी एकसारखीच असते. त्याप्रमाणे अहंकारयुक्त स्थूल देहाचे आवरण बाजूला केले की, अहंकार नष्ट होऊन पूर्ण ब्रह्माचे दर्शन होते. ते ब्रह्म निर्गुण निराकार असून सर्व देहात एकसारखेच वास करून असते. जे विवेकचतुर असतात ते ह्याप्रमाणे आत्मवस्तूची ओळख करून घेतात. हेच विवेकज्ञान होय. आत्मवस्तू ही निर्गुण निराकार असते. परंतु श्रुतींच्या माध्यमातून आपल्याला तिचे इत्थंभूत शब्दज्ञान होते. वेदरूप नारायण मीच आहे आणि वेद हे माझे मनोगत होय. त्यामुळे वेदवचन प्रमाण मानून जे श्रुतीच्या शब्दज्ञानातून आत्मवस्तू जाणून घेतात. निजात्म स्वरूप जाणून घेणे सर्वांनाच शक्य होते असे नाही कारण त्यासाठी देहादि विषयांचा मनापासून त्याग घडावा लागतो.








