31 रोजीमराठीला राजभाषेच्या दर्जासाठी रणशिंग फुंकणार
पणजी/ प्रतिनिधी
अभिजात मराठी भाषेलाही गोव्यात राजभाषेचा दर्जा मिळावा या मागणीसाठी निर्णायक लढा देणाऱ्या आंदोलनाचे रणशिंग फुंकण्यासाठी मराठी राजभाषा निर्धार समितीने येत्या सोमवार दि. 31 मार्च रोजी मराठीप्रेमी कार्यकर्त्यांचा प्रातिनिधिक ‘ निर्धार मेळावा’ घेण्याचे काल निश्चित केले. पणजी येथील मिनेझिस ब्रागांझा मोठ्या सभागृहात सदर ‘ निर्धार मेळावा’ घेण्यात येणार आहे. सर्व 12 तालुक्यातील वीस प्रखंडांतून प्रातिनिधिक स्वऊपात कार्यकर्ते एकत्र येतील. त्या सर्वांना मराठी राजभाषेसाठी अंतिम निर्णायक लढा देण्यासाठी कटिबद्धतेची ‘प्रतिज्ञा’ देण्यात येणार आहे.
यावेळी व्यासपीठावर ज्येष्ठ पत्रकार गुऊदास सावळ व ‘मराठी मायबोली’ गटाचे प्रकाश भगत उपस्थित होते. गोमंतक मराठी अकादमी, पर्वरी मराठी भवनच्या सभागृहात निमंत्रक प्राचार्य सुभाष भास्कर वेलिंगकर यांच्या मार्गदर्शनाखाली सुकाणू समितीच्या काल झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. मागील मराठी राजभाषा आंदोलनाचे अध्वर्यू गो.रा. ढवळीकर यांनीही या बैठकीत मार्गदर्शन केले. निर्धार मेळाव्याच्या पूर्वतयारीसाठी सर्व प्रखंडांसाठी मराठीप्रेमी कार्यकर्त्यांच्या टीम्स निश्चित करण्यात येऊन, प्रखंडस्थानी बैठकांचे नियोजन करण्यात आले. 10000 आवाहनपत्रांचे वितरण पहिल्या टप्प्यात करण्याचे ठरले. शेवटी सांघिक पसायदान होऊन बैठकीची सांगता झाली.









