वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
भारताचा पॅरा अॅथलिट निरज यादव उत्तेजक चाचणीत दोषी ठरला आहे. दरम्यान नुकत्याच झालेल्या आशियाई पॅरा क्रीडा स्पर्धेत मिळविलेली दोन सुवर्णपदके भारताला गमवावी लागतील. तसेच पदक तक्त्यातील स्थानही एका अंकाने घसरेल.
चीनमधील हाँगझाऊ येथे पॅरा आशियाई क्रीडा स्पर्धा घेण्यात आली होती आणि भारताने पदकांचे शतक पार केले होते. या स्पर्धेमध्ये भारताने 29 सुवर्ण, 31 रौप्य आणि 51 कास्य अशी एकूण 111 पदकांची लयलूट केली होती. स्पर्धेच्या पदक तक्त्यामध्ये भारताने पाचवे स्थान पटकावले होते. या स्पर्धेला प्रयाण करण्यापूर्वी सहा दिवस अगोदर बेंगळूरमध्ये निरज यादवची उत्तेजक चाचणी घेण्यात आली होती. या चाचणीवेळी निरजच्या मूत्रल नमुन्यामध्ये निर्बंध घातलेले उत्तेजक द्रव आढळल्याचे नाडाने सांगितले. निरज यादवने या स्पर्धेमध्ये भालाफेक आणि थाळीफेक या प्रकारात दोन सुवर्णपदके मिळविली होती. सदर स्पर्धा 22 ते 28 ऑक्टोबर दरम्यान झाली होती. निरज यादव उत्तेजक चाचणीत दोषी ठरल्याने भारताला निरजने मिळविलेली दोन सुवर्णपदके परत करावी लागतील. त्यामुळे या स्पर्धेतील भारताच्या सुवर्णपदकांची संख्या 27 राहील. त्यामुळे पदक तक्त्यामध्ये भारत सहाव्या स्थानावर राहील. चीनमधील झालेल्या या स्पर्धेपूर्वी निरज यादवने सप्टेंबर महिन्यात निवड चाचणीवेळी उत्तेजक चाचणीसाठी तीन मूत्रल नमुने दिले होते. पण या नमुन्यामध्ये कोणतेही उत्तेजक द्रव आढळले नसल्याचे सांगण्यात आले. नाडाकडून अद्याप निरज यादववर हंगामी निलंबनाची कारवाई करण्यात आलेली नसल्याचे भारतीय पॅरा ऑलिंपिक समितीचे प्रमुख प्रशिक्षक एस. सत्यनारायण यांनी सांगितले.









