बीडीएफए चषक फुटबॉल स्पर्धा
बेळगाव : कर्नाटक राज्य फुटबॉल संघटना मान्यताप्राप्त बेळगाव जिल्हा फुटबॉल संघटना आयोजित बीडीएफए चषक वरिष्ठ साखळी फुटबॉल स्पर्धेत उद्घाटनाच्या सामन्यात निपाणी फुटबॉल क्लबने वायएमसीए संघाचा 1-0 असा पराभव करुन विजयी सलामी दिली. लव्ह डेल स्कूलच्या टर्फ मैदानावर स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून बीडीएफए अध्यक्ष पंढरी परब, खजिनदार एस. एस. नरगुडी, सहसचिव प्रशांत देवदानम, सामना अधिकारी रॉस्ट्रिन जेम्स, इम्रान बेपारीसह मान्यवर उपस्थित होते. पाहुण्यांचे स्वागत दोन्ही संघाच्या कर्णधारांनी केले. पाहुण्यांना दोन्ही संघाच्या खेळाडूंची ओळख करुन देऊन व फुटबॉल लाथाडून स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. उद्घाटनाचा सामना वायएमसीए व निपाणी फुटबॉल क्लब यांच्यात झाला. या सामन्यात 4 थ्या मिनिटाला निपाणीच्या करण मानेने मारलेला वेगवान फटका गोलपोस्टला लागून बाहेर गेला. 14 व्या मिनिटाला वायएमसीएच्या धीरजने गोल करण्याची सुवर्णसंधी दवडली.
17 व्या मिनिटाला निपाणीच्या जितू पुटाणकरने बचावफळीला चकवत गोलमुखात वेगवान फटका मारला होता. पण वायएमसीएच्या गोलरक्षकाने आपल्या डावीकडे झोकून चेंडू उत्कृष्ट अडविला. त्यामुळे पहिल्या सत्रात दोन्ही संघांना गोल करण्यात अपयश आल्याने गोलफलक कोराच राहिला. दुसऱ्या सत्रात 41 व्या मिनिटाला निपाणीचा आघाडीचा खेळाडू करण मानेच्या उत्कृष्ट पासवर जितू पुटाणकरने खेळाडूंना चकवत सुरेख गोल करुन 1-0 ची महत्त्वाची आघाडी मिळवून दिली. 44 व्या मिनिटाला वायएमसीएच्या अॅल्सनने मारलेला फटका निपाणीच्या गोलरक्षकने उत्कृष्ट अडविला. 50 व्या मिनिटाला आदि संकपाळने गोल करण्याची नामी संधी दवडली. दुसऱ्या सत्रात मात्र वायएमसीएने आक्रमक खेळी करुनसुद्धा निपाणीच्या बचावफळीमुळे त्यांना 1-0 असा निसटता पराभव पत्करावा लागला.
बाप-लेकाची जोडी मैदानात
लव्ह डेल स्कूलच्या मैदानावर खेळविण्यात आलेल्या उद्घाटन सामन्यात निपाणी व वायएमसीए सामन्यादरम्यान निपाणी संघाचे ज्येष्ठ खेळाडू सचिन पुटाणकर व त्यांचे चिरंजीव जितू पुटाणकर या बाप-लेकाच्या जोडीला या सामन्यात खेळायची संधी मिळाली. यापूर्वी सचिन यांनी प्रशिक्षकाची भूमिका बजावली होती. पण खेळाडूंच्या कमतरतेमुळे या सामन्यात त्यांना उतरावे लागले. बाप-लेक खेळण्याचा हा अनोखा प्रसंग प्रेक्षकांना पहायला मिळाला.









