टीएफए उपविजेता, बेळगाव प्रीमियर लीग वरिष्ठ फुटबॉल स्पर्धा
बेळगाव : कर्नाटक राज्य फुटबॉल संघटना मान्यता प्राप्त, बेळगाव जिल्हा फुटबॉल संघटना आयोजित बेळगाव प्रीमियर लीग वरिष्ठ फुटबॉल स्पर्धेच्या अंतिम सामन्यात निपाणी एफसीने टीएफए संघाचा टायब्रेकरमध्ये 5-2 असा पराभव करुन बीडीएफएने चषक पटकाविला. युनायटेड गोवन्सने तृतीय तर टिळकवाडी इलेव्हनला चौथ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले. लव्हडेल स्कूलच्या मैदानावरती खेळविण्यात आलेल्या अंतिम सामन्याचे उद्घाटन ज्येष्ठ पंच व माजी सचिव गोपाळ खांडे, अध्यक्ष पंढरी परब, उपाध्यक्ष लेस्टर डिसोजा, प्रशांत देवदानम, अल्लाबक्ष बेपारी, जॉर्ज रॉड्रिग्ज, अमित पाटील, एस. एस. नरगोडी, दिनेश पतकी, सचिन पुटाणकर आदी मान्यवरांच्या उपस्थितीत दोन्ही संघातील खेळाडूंची ओळख करुन देण्यात आली. अहमदाबाद येथे विमान दुर्घटनेत मृत पावलेल्या प्रवाशांना श्रद्धांजली वाहण्यात आली. त्यानंतर सामन्याला सुरुवात करण्यात आली.
या सामन्यात पहिल्या मिनिटापासूनच दोन्ही संघांनी एकमेकांवर आक्रमक चढाया केल्या. 10 व्या मिनिटाला करण मानेने मारलेला वेगवान फटका टीएफएचा गोलरक्षक अमित कसोटीया याने उत्कृष्ट झेलला. 14 व्या मिनिटाला टीएफएच्या विनय नाईकने गोल करण्याची नामी संधी दवडली. 17 व्या मिनिटाला टीएफएच्या विकी यशराजच्या पासवर वैभव मुरगोडने गोल करुन 1-0 ची आघाडी टीएफएला मिळवून दिली. 20 व्या मिनिटाला निपाणीच्या जीत पुटाणकरने मारलेला वेगवान फटका गोलपोस्टला लागून बाहेर गेला. 23 व्या मिनिटाला निपाणीच्या करण मानेच्या पासवर आदित्य संगपाळने बरोबरीचा गोल करुन 1-1 अशी बरोबरी साधत सामन्यात रंगत निर्माण केली.
दुसऱ्या सत्रात 40 व्या मिनिटाला जीत पुटाणकरने मारलेला फटका टीएफएचा गोलरक्षक अमितने उत्कृष्ट अडविला. 44 व्या मिनिटाला टीएफएच्या वैभव मुरगोडने गोल करण्याची संधी दवडली. निर्धारीत वेळेत दोन्ही संघांचा गोलफलक समान राहिल्याने पंच अमिन बेपारीने टायब्रेकर नियमाचा वापर केला. त्यामध्ये निपाणीने 5-2 अशा गोलफरकाने पराभव करुन विजेतेपद पटकाविले. निपाणीतर्फे करण माने, ऋषी भाडोलकर, प्रशांत आरोळकर, जीत पुटाणकर यांनी गोल केले. टीएफएतर्फे सचिन लोहार यांनी गोल केला तर भालचंद्र दळवी व शुभम चव्हाण यांनी चेंडू बाहेर मारला. तिसऱ्या क्रमांकासाठी खेळविण्यात आलेल्या सामन्यात युनायटेड गोवन्सने टिळकवाडी इलेव्हनचा 4-0 असा पराभव केला. दुसऱ्याच मिनिटाला अभिषेकच्या पासवर अनासने गोल करुन 1-0 ची आघाडी युनायटेड गोवन्सला मिळवून दिली.
13 व्या मिनिटाला अनासच्या पासवर नावलने दुसरा गोल करुन पहिल्या सत्रात 2-0 ची महत्त्वाची आघाडी मिळवून दिली. दुसऱ्या सत्रात 33 अणि 47 व्या मिनिटांना अभिषेकच्या पासवर नावलने दोन गोल करुन 4-0 अशी आघाडी युनायटेड गोवन्सला मिळवून दिली. या सामन्यात टिळकवाडी इलेव्हनतर्फे गोल करण्यात अपयश आले. सामन्यानंतर प्रमुख पाहुणे ज्येष्ठ पंच व माजी सचिव गोपाळ खांडे, अध्यक्ष पंढरी परब, उपाध्यक्ष लेस्टर डिसोजा, प्रशांत देवदानम, अल्लाबक्ष बेपारी, जॉर्ज रॉड्रिग्ज, एस. एस. नरगोडी, दिनेश पतकी, अमित पाटील, सचिन पुटाणकर यांच्या हस्ते विजेत्या निपाणी एफसीला व उपविजेत्या टीएफए संघाला आकर्षक चषक, युनायटेड गोवन्स व टिळकवाडी इलेव्हन यांनाही चषक देवून गौरविण्यात आले.
स्पर्धेतील उत्कृष्ट खेळाडू जीत सचिन पुटाणकर-निपाणी, उत्कृष्ट गोलरक्षक स्टिफन कंडोला-वायएमसीए व स्पर्धेतील उत्कृष्ट खेळाडू वैभव धुरी-निपाणी यांना चषक देवून गौरविण्यात आले. स्पर्धेला पंच म्हणून अमिन बेपारी, इम्रान बेपारी, कृष्णकांत मुचंडी व फिरोज शेख, अभिषेक चेरेकर यांनी काम पाहिले. तर सामनाधिकारी म्हणून रॉस्ट्रीन जेम्स यांनी प्रमुख भूमिका बजावली.









