► वृत्तसंस्था / थिरुवनंतरपुरम
‘निपा’ या विषाणूचे काही रुग्ण आढळल्याने, तसेच दोन रुग्णांचा या आजारामुळे मृत्यू झाल्याने केरळमध्ये दक्षतेचा इशारा देण्यात आला आहे. दोन जणांच्या मृत्यूला केरळ सरकारने बुधवारी दुजोरा दिला. या आजारावर उपाययोजना करण्यासाठी राज्य सरकारने विशेष उच्चपातळी बैठकीचे आयोजन केले होते.
या आजाराचा प्रसार होऊ नये, तसेच ज्यांना लागण झाली आहे, त्यांच्यावर योग्य उपचार त्वरित करण्यासंबंधी बैठकीत विचारविमर्श करण्यात आला. हा आजार घातक असला तरी विनाकारण घाबरण्याचे कारण नाही. तो बरा होण्यासारखा आहे. तसेच सर्वसामान्य दक्षता घेतल्यास त्याला रोखले जाऊ शकते. लोकांनी घाबरुन न जाता योग्य त्या नियमांचे पालन करावे. लागण झालेल्या व्यक्तीचा संपर्क टाळावा, अशा सूचना बैठकीनंतर करण्यात आल्या आहेत.
पुन्हा मास्क येणार…
केरळात निपाच्या लागणीनंतर पुन्हा मास्कचा उपयोग करणे अनिवार्य होण्याची शक्यता आहे. कोरोना काळात देशभर मास्कचा उपयोग अनिवार्य करण्यात आला होता. तथापि, निपाचा प्रसार केरळच्या काही भागांपुरताच मर्यादित आहे. त्यामुळे या राज्याच्या ज्या भागांमध्ये अधिक रुग्ण आहेत, तेथे मास्क अनिवार्य केला जाण्याची शक्यता आहे. निर्बंधित क्षेत्रांमध्ये बाहेरुन अन्य कोणास जाण्यास बंदी घालण्यात आली आहे. तसेच निर्बंधित क्षेत्रांमधून कोणाला बाहेर जाण्यासही बंदी घालण्यात आली आहे, असे राज्य सरकारने स्पष्ट केले आहे.
बालकांनाही लागण
या आजाराची लागण 10 वर्षांखालच्या काही बालकांनाही झाल्यामुळे तो अधिक चिंतेचा विषय बनला आहे. मात्र, कोरोनासारखा हा आजार झपाट्याने पसरत नाही, असेही काही तज्ञांचे म्हणणे आहे. अन्य राज्यांनीही वेळीच दक्षता घेऊन निपाची लागण होणार नाही, अशी व्यवस्था करावी, असे आवाहन करण्यात आले आहे. केरळमध्ये सध्या कोझिकोड जिल्ह्यात याचे प्रमाण अधिक आहे.
प्रसार बांगलादेशातून?
केरळमध्ये निपाचा जो व्हेरियंट आढळून आला आहे, तो बांगलादेशात निर्माण झाल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसांमध्ये बांगला देशात जाऊन आलेल्या नागरीकांचा शोध घेऊन त्यांची तपासणी करण्यात येणार आहे. हा व्हेरियंट झपाट्याने पसरत नसला तरी तो अधिक प्रमाणात प्राणघातक आहे, असे संशोधनातून दिसून आल्याने अधिक दक्षता घेण्यात येत आहे.









