भ्रष्ट गब्बर अधिकाऱ्यांना अडकण्याआधीच पैशांची वसुली : लोकायुक्तमधील गोपनीय माहितीची चोरी, कोट्यावधी रुपये उकळले
प्रतिनिधी/ बेळगाव
निंगाप्पा सावंत (वय 46) असे त्याचे नाव आहे. बेंगळूर येथील लोकायुक्त अधिकाऱ्यांना निंगाप्पाच्या अटकेनंतर सविस्तर पत्रक प्रसिद्धीस द्यावे लागले. आजवर राज्यातील विविध जिल्ह्यात निंगाप्पावर 35 हून अधिक गुन्हे नोंद आहेत. उत्तर कर्नाटकातील बेळगाव, बागलकोट, गदग, विजापूर आदी जिल्ह्यातही दहाहून अधिक गुन्ह्यात निंगाप्पाचे नाव आहे. निंगाप्पा हा सरकारी अधिकाऱ्यांना पिडायचा. त्यांच्याकडून पैसे वसूल करायचा. तुमच्यावर कारवाई होऊ नये तर मी सांगतो ते ऐका, असे सांगत तो पैशांची मागणी करायचा.
निंगाप्पावर बेळगाव येथील सीईएन पोलीस स्थानकात तीन वर्षांपूर्वी दोन गुन्हे दाखल झाले आहेत. बैलहोंगल, कित्तूर व रामदुर्ग पोलीस स्थानकातही फसवणुकीचे गुन्हे दाखल झाले आहेत. पोलीस दलात हवालदार असणारा निंगाप्पा दीर्घकाळ सेवेत गैरहजर होता. त्यामुळे त्याला बडतर्फ करण्यात आले होते. या कारवाईनंतर पोलीस दलातील जुन्या ओळखींचा वापर करीत लोकायुक्त अधिकाऱ्यांच्या त्याने ओळखी वाढविल्या.
भ्रष्ट सरकारी अधिकाऱ्यांवर लोकायुक्त अधिकारी छापे टाकतात. भ्रष्टाचाराच्या माध्यमातून या अधिकाऱ्यांनी किती माया जमवली आहे? हे जाहीर करून त्यांच्यावर खटले दाखल करतात. याबरोबरच सरकारी कामांसाठी लाच घेणाऱ्या अधिकाऱ्यांना रंगेहाथ पकडण्यात येते. त्यामुळे सरकारी अधिकारी व भ्रष्ट राजकीय नेत्यांमध्ये लोकायुक्तांची नेहमी भीती असतेच.
सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती संतोष हेगडे हे कर्नाटकाच्या लोकायुक्त पदावर होते. त्यांच्यासोबतीला निवृत्त आयपीएस अधिकारी आर. के. दत्ता हे कार्यरत होते. त्यावेळी केवळ सरकारी अधिकारीच नव्हे तर राजकीय नेत्यांनाही घाम फुटायचा. लोकायुक्तांच्या चौकशी अहवालावरून अनेक मंत्री, आमदारांना कारागृहात जावे लागले. अशी ख्याती असलेल्या लोकायुक्त संस्था निंगाप्पा व अशा काही व्यक्तींमुळे बदनाम होत चालली आहे.
उपलब्ध माहितीनुसार निंगाप्पाने कारवाई टाळण्यासाठी जवळजवळ शंभरहून अधिक सरकारी अधिकाऱ्यांना धमकावून त्यांच्याकडून कोट्यावधी रुपये उकळले आहेत. निंगाप्पाला लोकायुक्त पोलीसप्रमुख श्रीनाथ जोशी यांनी साथ दिल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. उच्च न्यायालयाने निंगाप्पा व श्रीनाथ जोशी या दोघांनाही दिलासा दिला असला तरी आणखी 35 हून अधिक जणांची नावे निंगाप्पाच्या जबानीत उघडकीस आली आहेत. त्यांची चौकशी करण्यात येत आहे.
तुमची फाईल तयार झाली आहे. कोणत्याही क्षणी तुमच्यावर छापे पडू शकतात, असे सांगत अनेक अधिकाऱ्यांना लुटण्यात आले आहे. अधिकाऱ्यांकडून उकळलेली रक्कम निंगाप्पाने क्रिप्टो करन्सीमध्ये गुंतवल्याचे उघडकीस आले आहे. त्याची तेरा वॅलेट गोठवण्यात आली आहेत. लोकायुक्तमध्ये कार्यरत असणाऱ्या अनेक अधिकाऱ्यांनी निंगाप्पाला याकामी मदत केल्याचा संशय आहे. निंगाप्पामुळे वादात अडकलेले आयपीएस अधिकारी श्रीनाथ जोशी हेही मूळचे बेळगाव जिल्ह्यातील आहेत.
कोणकोणत्या अधिकाऱ्यांकडून निंगाप्पाने किती पैसे उकळले आहेत? याची माहिती लोकायुक्त अधिकाऱ्यांना मिळाली आहे. भ्रष्ट अधिकाऱ्यांवर छापे टाकताना गोपनीयता बाळगली जाते. जेणेकरून या कारवाईची माहिती त्यांना मिळू नये, याची खबरदारी घेतलेली असते. कारवाईची माहिती आधीच अधिकाऱ्यांना पोहोचत होती. त्याच्या बदल्यात निंगाप्पासारखे मध्यस्थ व लोकायुक्तमधील काही अधिकाऱ्यांना त्याचा मोठा फायदा मिळत होता, अशी धक्कादायक माहिती तपासात उघडकीस आली आहे.
अबकारी अधिकाऱ्यांनाच लक्ष्य
खासकरून अबकारी अधिकाऱ्यांनाच निंगाप्पा आपले लक्ष्य बनवत होता. सार्वजनिक बांधकाम खाते, अबकारी, पाटबंधारे आदी गब्बर खात्यातील अधिकाऱ्यांना जाळ्यात अडकविण्यासाठी नेहमीच प्रयत्न सुरू असतात. निंगाप्पाला अबकारी विभागातील ज्या ज्या अधिकाऱ्यांनी मोठी रक्कम दिली आहे, त्यांची चौकशी करण्यात येत आहे. त्याच्या व्हॉट्सअॅपमधील चॅटिंगवरून वेगवेगळ्या अधिकाऱ्यांशी त्याचे घनिष्ठ संबंध असल्याचेही उघडकीस आले आहे. लोकायुक्तांच्या नावे धमकावणाऱ्या तोतयांना कोणीही पैसे देऊ नयेत, अशा व्यक्तींविषयी 080-22011205 या क्रमांकावर माहिती देण्याचे आवाहन लोकायुक्त अधिकाऱ्यांनी केले आहे.
मुरग्याप्पाच्या आठवणी झाल्या ताज्या

ज्या कामासाठी निंगाप्पा ठळक चर्चेत आला आहे, हे काम बेळगाव येथील एक बडतर्फ पोलीस आधीपासूनच करीत होता. मुरग्याप्पा निंगाप्पा कुंभार (वय 57) राहणार सदलगा असे त्याचे नाव आहे. केवळ बेळगावच नव्हे तर राजधानी बेंगळूरसह राज्यातील विविध जिल्ह्यात मुरग्याप्पावरही 57 हून अधिक गुन्हे दाखल झाले आहेत. लोकायुक्त अधिकारी असल्याचे सांगून तो सरकारी अधिकारी व कंत्राटदारांना धमकावयाचा. सहा महिन्यांपूर्वी 27 जानेवारी रोजी मुरग्याप्पाला कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळनजीक विजापूर पोलिसांनी अटक केली होती. पोलीस दलातून बडतर्फ झाल्यानंतर निंगाप्पा तोतया अधिकाऱ्याच्या भूमिकेत वावरतो. तुमची फाईल तयार आहे, कारवाई नको असेल तर येऊन भेटा, असे सांगत तो सरकारी अधिकाऱ्यांना लक्ष्य बनवतो. एखाद्या प्रकरणात जामीन झाल्यानंतर तो पुन्हा त्याच कामाला लागतो. गेल्या आठवड्यात उघडकीस आलेल्या निंगाप्पाच्या कारवाईमुळे बेळगाव जिल्ह्यातील मुरग्याप्पाच्या आठवणी ताज्या झाल्या आहेत.









