Heavy Rain In Lucknow : लखनऊमध्ये मुसळधार पावसामुळे लष्कराच्या छावणीची भिंत कोसळून नऊ जणांचा मृत्यू झाला. यामध्ये दोन जण जखमी झाले आहेत. दिलकुशा येथे ही घटना घडली. शुक्रवारी पहाटेच्या सुमारास हा प्रकार घडल्याचं समोर आलं आहे.लष्कर विभागाने याबाबत माहिती दिली आहे. लखनऊमध्ये गेल्या २४ तासांपासून मुसळधार पाऊस कोसळत असून अनेक भागांमध्ये पाणी साचलं आहे.
लष्करानं दिलेल्या माहितीनुसार,
मुसळधार पावसामुळे लष्करी छावणीच्या सीमेवरची ही भिंत कोसळली. या दुर्घटनेत मृत्यूमुखी पडलेले सर्वजण बांधकाम मजूर होते. एका व्यक्तीला वाचवण्यात यश आलं आहे. असं लष्कराकडून सांगण्यात आलं आहे.

नेमकं काय घडलं?
लष्करानं दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी पहाटेच्या सुमारास ही दुर्घटना घडल्यानंतर ३ वाजता लष्कराचे जवान घटनास्थळी पोहोचले. लखनऊच्या दिलकुशा भागात ही लष्करी छावणी आहे. काही बांधकाम मजूर छावणीच्या भिंतीला लागून झोपड्यांमध्ये राहात होते. पावसामुळे ही भिंत थेट या झोपड्यांवरच कोसळल्यामुळे ही दुर्घटना झाली. जवानांनी ९ मृतदेह ढिगाऱ्याखालून बाहेर काढले. एका व्यक्तीला जिवंत बाहेर काढण्यात यश आलं असून त्याच्यावर नजीकच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.









