नवसारी / वृत्तसंस्था
गुजरातच्या नवसारी जिह्यात शनिवारी सकाळी फॉर्च्युनर कार आणि लक्झरी बसची समोरासमोर धडक झाली. यामध्ये 9 जणांचा मृत्यू झाला. तर 30 हून अधिक जण जखमी झाले आहेत. सर्व जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेनंतर बसचालकाला हृदयविकाराचा झटका आला असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. लक्झरी बस अहमदाबादहून वलसाडला जात असताना जिह्यातील वेसवण गावात अपघात घडला. फॉर्च्युनर कार दुभाजकाला धडकून बसला आदळल्याने हा अपघात झाल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले. या अपघाताबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी शोक व्यक्त करत मृतांच्या वारसांना 2 लाख रुपये आणि जखमींना 50 हजार रुपयांची मदत जाहीर केली आहे.









