देवगड :
दक्षिण कोकणची काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्री क्षेत्र कुणकेश्वरची महाशिवरात्री यात्रा 26 व 27 फेब्रुवारीला होत आहे. या महाशिवरात्री यात्रा उत्सवानिमित्त श्री देव कुणकेश्वरच्या भेटीसाठी नऊ देवस्वाऱ्या येणार असून श्री इनामदार रामेश्वर संस्थान–आचरा येथील श्रीदेव रामेश्वरची (कसबा आचरा) देवस्वारी तब्बल 39 वर्षांनी, शिरगावची श्रीदेवी पावणादेवी 22 वर्षांनी, तर देवगड–जामसंडेची ग्रामदेवता श्री दिर्बादेवी रामेश्वरची देवस्वारी 12 वर्षांनी श्रीदेव कुणकेश्वरच्या भेटीसाठी येणार आहे. त्यामुळे यावर्षी भाविकांच्या गर्दीचा उच्चांक होणार असून देवस्थान ट्रस्टमार्फत यात्रोत्सवाची जय्यत तयारी सुरू असल्याची माहिती देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष एकनाथ तेली यांनी पत्रकार परिषदेत दिली.
श्री देव कुणकेश्वर देवस्थान ट्रस्टच्या कार्यालयात शुक्रवारी आयोजित पत्रकार परिषदेत तेली यांनी महाशिवरात्री यात्रोत्सवानिमित्त श्री देव कुणकेश्वरच्या भेटीसाठी येणाऱ्या देवस्वाऱ्यांची माहिती दिली. यावेळी देवस्थान ट्रस्टचे उपाध्यक्ष गणेश वाळके, खजिनदार उदय पेडणेकर, सदस्य शैलेश बेंडाळे, महेश जोईल, संजय वाळके उपस्थित होते.
तेली म्हणाले, यावर्षी कुणकेश्वर भेटीसाठी श्री देव रामेश्वर, कसबा– आचरा (श्री इनामदार रामेश्वर संस्थान– आचरा), श्री पावणादेवी शिरगाव– देवगड, श्री गांगेश्वर नारिंग्रे–देवगड, श्री देव माधवगिरी– माईण–कणकवली, श्री देव गांगेश्वर– बावशी बेळणे (ता. कणकवली), श्री देव जैनलिंग रवळनाथ महालक्ष्मी पावणादेवी, गांगो–बिडवाडी (ता. कणकवली), श्री दिर्बादेवी रामेश्वर, जामसंडे– देवगड, श्री गांगेश्वर पावणाई भावई– दाभोळे देवगड, श्री पावणादेवी हुंबरट– कणकवली अशा देवस्वाऱ्या येणार आहेत. भाविकांच्या गर्दीचा उच्चांक गर्दी लक्षात घेता देवस्थान ट्रस्टकडून योग्य नियोजन सुरू आहे.








