शिरशी :
अंत्री बुद्रुक (ता.शिराळा) येथील शेतकरी दत्तात्रय मोरे यांच्या गोठ्यामधील एकूण १७ गायींपैकी ९ गायींना सकाळी पशुखाद्य देण्यात आले होते. बाकी ८ गाई गाभण असल्यामुळे त्यांना वेगळे पशुखाद्य देण्यात आले होते. त्या गाई सुरक्षित आहेत. परंतु ९ गाई पशुखाद्य दिल्यानंतर अवघ्या पंधरा-वीस मिनिटात पोट फुगून मृत्यूमुखी पडल्या.
गावामध्ये समजेल तशी लोकांनी गोठ्यावर गर्दी केली. माजी मंत्री शिवाजीराव नाईक व विराज नाईक यांनी समक्ष भेट दिली. शिवाजीराव नाईक यांनी पंचायत समितीचे गट विकास अधिकारी, पशुसंवर्धन अधिकारी व पोलीस स्टेशन व वारणा कारखान्याचे पशुसंवर्धन अधिकारी यांना फोनवरून सदरच्या घटनेची माहिती दिली व संबंधित शेतकऱ्याला योग्य न्याय मिळावा, या पद्धतीने पंचनामे करण्याच्या सूचना दिल्या. सदरची घडलेली घटना ही अतिशय दुःखद घटना आहे.
यावेळी तहसीलदार श्यामला खोत, गटविकास अधिकारी प्रकाश पोळ, विराज नाईक, पशुसंवर्धन अधिकारी पंचायत समिती शिराळा सतीश कुमार जाधव, विस्तार अधिकारी रवींद्र मटकरी, वारणा दूध संघाचे अधिकारी एस. एन. खोत, डॉ. कैलास पोकळे, डॉ. दीपक पाटील यांनी तात्काळ घटनास्थळी भेट दिली. तर सुनील पाटील, प्रताप चव्हाण, के.डी. पाटील, सरपंच सुजाता पाटील, उपसरपंच राजेश चव्हाण, उत्तम पाटील, प्रकाश पाटील, सुधीर कुंभार, जालिंदर मोरे, महादेव चव्हाण, विश्वास मोरे, आनंदा मोरे, शहाजी मोरे, शिवाजी चव्हाण, निलेश पाटील, राजू पाटील व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
- पशुखाद्य कंपनीने भरपाई द्यावी..
अंत्री बुद्रुक येथील विषबाधेमुळे ९ गायींचा मृत्यू झाल्याची घटना अतिशय वाईट असून दत्तात्रय मोरे या शेतकऱ्यावर फार मोठे संकट कोसळले आहे. पशुखाद्य ज्या कंपनीचे आहे. त्या कंपनीने संबंधित शेतकरी अडचणीतून बाहेर येण्यासाठी योग्य तो तपास करून मदत करावी.
– माजी राज्यमंत्री शिवाजीराव नाईक.








