मिरज :
शहर आणि परिसरात गेल्या चार दिवसांपासून मोकाट कुत्र्यांनी धुमाकूळ घातला आहे. रेवणी गल्ली, बोकुड चौक, शास्त्री चौक आणि मिरासाहेब दर्गा परिसरात नऊ बालकांवर मोकाट कुत्र्यांनी हल्ला केल्याची घटना घडली. या सर्व बालकांवर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. कोणाच्या हाताला, कोणाच्या पायाला, तोंडाला, कानाला आदी वेगवेगळ्या ठिकाणी कुत्र्यांनी चावा घेऊन लचके तोडले आहेत. मोकाट कुत्र्यांच्या दहशतीमुळे नागरिक भयभीत झाले आहेत. डॉगव्हॅनचे पथक केवळ फोटो काढून पगार घेण्यासाठी प्रभाग पर्यटन करत आहे. या प्रकारानंतर सुधार समितीने महापालिका आरोग्य अधिकाऱ्यांना धारेवर धरले. मोकाट कुत्र्यांचा तातडीने बंदोबस्त न झाल्यास महापालिकेत कुत्री सोडण्याचा इशारा देण्यात आला आहे.
शहरात १० ते १५ कुत्र्यांच्या झुंडी फिरत आहेत. महापालिकेच्या प्रवेशद्वारासमोरच कुत्र्यांच्या झुंडी असताना डॉगव्हॅनचे पथक कुत्री नसलेल्या ठिकाणी कुत्री पकडण्याचा तकलादू प्रयोग करत आहे. महापालिकेकडून निष्काळीपणा दाखविला गेल्याने बालकांसह वृध्दांचा जीव धोक्यात आला आहे. दररोज विविध प्रभागांमध्ये कुत्र्यांचे हल्ले झाल्याच्या घटना समोर येत आहेत. गेल्या चार दिवसात विशेष करुन रेवणी गल्ली, बोकुड चौक,शास्त्री चौक, दर्गा परिसरात मोकाट कुत्र्यांनी धुमाकूळ घातला. गुरूवारपासून सोमवारपर्यंत नऊ बालकांवर कुत्र्यांनी हल्ले केले. सोमवारी पटवेगार गल्ली येथेही एका वृध्दावर कुत्र्यांनी हल्ला केला. कुत्र्यांच्या हल्ल्यातील सर्व जखमींवर सध्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सिव्हील हॉस्पिटलमधील रेबिज विभाग कुत्र्यांनी चावलेल्या जखमी रुग्णांमुळे हाऊसफुल्ल झाला आहे. त्यात सिव्हील रुग्णालयाला दररोज ५० रेबिज इंजेक्शन मिळत असल्याने सर्व रुग्णांवर केवळ प्राथमिक उपचार केले जात आहेत. रेबिजच्या इंजेक्शनसाठी दोन-दोन दिवसांची प्रतिक्षा करावी लागत आहे. दुर्दैवी बाब म्हणजे महापालिका दवाखान्यात रेबिज इंजेक्शनच नसल्याचे समोर आले आहे.या प्रकारानंतर सुधार समिती आक्रमक झाली आहे. समितीच्या पदाधिकाऱ्यांनी आयुक्त रविंद्र ताटे यांना धारेवर धरुन जाब विचारला.
- रेबिजचे इंजेक्शनही मिळेना
शासकीय रुग्णालयाचा रेबिज विभाग सध्या जखमी बालकांनी भरला आहे. प्रत्येक बेडवर जखमी बालक आहे. महापालिका दवाखान्यात उपचाराची सोय नाही. रेबिजचे इंजेक्शनही नाही. त्यामुळे रुग्णांना शासकीय रुग्णालयावरच अवलंबून रहावे लागत आहे. मात्र, शासकीय रुग्णालयातही प्रति दिवस रेबिजच्या ५० लसी असतात. आधी दाखल असलेल्या रुग्णांना इंजेक्शन दिले जाते. मात्र, कुत्र्यांच्या हल्ल्यात जखमी असलेल्या रुग्णांची संख्या वाढत असताना रेबिज इंजेक्शनही त्या प्रमाणात मिळत नाही. इंजेक्शनसाठी दोन ते तीन दिवस प्रतिक्षा करावी लागत असल्याचे रुग्णांच्या नातेवाईकांकडून सांगण्यात आले.
- ठोस उपाययोजना करण्यात महापालिका कुचकामी
भटक्या कुत्र्यांचा उच्छाद वाढला आहे. अधिकारी उपाययोजना करण्याऐवजी नुसतं कारणे सांगत आहेत. डॉग व्हॅनसाठी स्वतंत्र पथक हवं आहे. आरोग्य विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांकडे अतिरिक्त भार देऊन केवळ वेळ मारून नेण्याचा प्रयत्न होतोय. हे अतिशय घातक आहे. आता मिरज सुधार समितीलाच पुढाकार घ्यावा लागेल.
-अॅड. ए. ए. काझी, मिरज सुधार समिती
- डॉग व्हॅनची संख्या वाढवणार
प्रमुख चौकांत चिकन, मटणसह मांसाहारचे उष्टे तसेच, टाकावू पदार्थ कचराकुंडीत टाकले जात असल्याने भटकी कुत्री हिंस्र होत असल्याचे चित्र आहे. अशा कुत्र्यांचा बंदोबस्त होण्यासाठी नागरिकांनी सजग राहिले पाहिजे. सामाजिक संघटनांनीही पुढाकार घ्यावा. सध्या कायद्यानुसार कुत्र्यांचे निर्बिजीकरण केले जाते. मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यासाठी मिरजेसाठी डॉग व्हॅनची संख्या वाढवली जाईल.
-डॉ. रविंद्र ताटे, महापालिका आरोग्य अधिकारी








