पुणे / प्रतिनिधी :
स्वारगेट पोलीस ठाण्याच्या हद्दीत मिनाताई ठाकरे वसाहतीत भाईगिरीच्या वर्चस्व वादातून सचिन माने व त्याच्या टोळीतील 10 ते 15 गुंडांनी हातात कोयते, कुऱ्हाडी व पालघनसारखी घातक शस्त्रे घेवून प्रतिस्पर्धी टोळीतील प्रकाश पवार व त्याच्या चार ते पाच साथीदारांवर प्राणघातक हल्ला केल्याच्या प्रकरणात 14 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून, पसार झालेल्या नऊ आरोपींना स्वारगेट पोलिसांनी जेरबंद केल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक इंदलकर यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिली आहे.
सचिन परशुराम माने (वय 24), विजय प्रमोद डिखळे (22), अमर तानाजी जाधव (23), रमेश दशरथ मॅडम (20), अजय प्रमोद डिखळे (24), रोहित मधुकर जाधव (27), यश किसन माने (21), आयुष किसन माने (21) पल्या पासंगे (21, सर्व रा.गुलटेकडी, पुणे), सुरज सतिश काकडे (26, रा. महषीनगर, पुणे), निखील पेटकर (22, रा. बिबवेवाडी, पुणे), अभिषेक पाटोळे (22, रा. पर्वती, पुणे), प्रमोद एस (रा. पर्वती,पुणे) या आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला असून, नऊ आरोपींना अटक करण्यात आली आहे.
टोळीवर कारवाई
सराईत गुन्हेगार सचिन माने (एस/एम कंपनी) याने स्वारगेट, सहकारनगर, मार्केटयार्ड परिसरात घातक शस्त्रांसह दरोडे, खून, खुनाचे प्रयत्न, जबरी चोऱ्या, खंडणीसारखे गंभीर गुन्हे केले असून, त्यांच्यावर एकूण 11 गुन्हे दाखल आहेत. एक वर्षांकरिता त्यास येरवडा कारागृहात स्थानबद्ध करण्यात आले होते. परंतु त्यानंतरही त्याच्या वर्तणुकीत कोणती सुधारणा झाली नाही. त्याने पुन्हा टोळी जमवून साथीदारांसह गुन्हेगारी सुरू केल्याने सदर टोळीवर नुकतेच मोक्कानुसारही कारवाई करण्यात आलेली आहे.
मैत्रिणीस भेटण्यास आला आणि अडकला पोलीस जाळय़ात
या टोळीतील मुख्य आरोपी सचिन माने गुन्हा केल्यापासून पसार झाला होता. पोलिसांना वारंवार गुंगारा देऊन तो राहण्याची ठिकाणे बदलत होता. घोरपडी पेठ येथे तो त्याच्या मैत्रिणीस भेटणार येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलीस पथकाने त्याच्यावर पाळत ठेऊन पहाटे दोन वाजता सचिन माने त्याची स्वत:ची ओळख लपवून सदर ठिकाणी आल्यावर पोलिसांनी झडप घालून त्यास कमरेला असलेल्या कोयतासह अटक केली. या वेळी कोयता शिताफीने काढताना पोलीस अंमलदार शिवा गायकवाड हे जखमी झाले असून, त्यांनी गायकवाड यास जागीच पकडून ठेवले.









