बेळगाव : कर्नाटक राज्य क्रिकेट संघटना मान्यता प्राप्त धारवाड विभागीय क्रिकेट संघटना आयोजित केएससीए चषक 16 वर्षाखालील आंतरक्लब क्रिकेट स्पर्धेत निना स्पोर्ट्स क्लब अ संघाने तानाजी स्पोर्ट्स क्लब अ संघाचा 10 गड्यांनी तर हुबळी स्पोर्ट्स क्लब अ संघाने टॅलेंट स्पोर्ट्स क्लब अ संघाचा पराभव करून प्रत्येकी 4 गुण मिळविले. 20 धावात 4 गडीबाद करणाऱ्या अफनान कित्तूर, व अष्टपैलू विकास पाटील यांना सामनावीर पुरस्कार देण्यात आला. केएससीए मैदानावरती खेळविण्यात आलेल्या पहिल्या सामन्यात तानाजी स्पोर्ट्स क्लब अ संघाने 44 षटकात सर्व गडी बाद 114 धावा केल्या. त्यात परशुराम जी ने 3 चौकारसह 22, संकल्पने 2 चौकारासह 17, नरेंद्रने 12 धावा केल्या. निनातर्फे अफनान कित्तूरने 20 धावात 4, मदनने 19 धावात 2, परशुराम 27 धावात 2 तर सर्वज्ञने 1 गडी बाद केला.
प्रत्युत्तरादाखल खेळताना निना स्पोर्ट्स संघाने 16.1 षटकात बिनबाद 115 धावा करून सामना 10 गड्यांनी जिंकला. त्यात मदन सी.ने 8 चौकारासह नाबाद 50 धावा करून अर्धशतक झळकविले. बिलाल एम.ने 7 चौकारासह नाबाद 48 धावा करून त्याला सुरेख साथ दिली. मदन व बिलाल या जोडीने पहिल्या गड्यांसाठी नाबाद 115 धावांची भागीदारी केली. दुसऱ्या सामन्यात टॅलेंट स्पोर्ट्स क्लब हुबळी संघाने प्रथम फलंदाजी करताना 48.2 षटकात सर्व गडी बाद 132 धावा केल्या. त्यात जॉय सोल्लदने 4 चौकारासह 37, प्रज्वल यलबुर्गीने 3 चौकारासह 21, अमृत पाटीलने 2 चौकारासह 17, पृथ्वी.के ने 15, पवनने 13, तर प्रितमने 11 धावा केल्या. हुबळी स्पोर्ट्स क्लबतर्फे विकास पाटीलने 41 धावात 2, युवराज उतावलेने 32 धावात 2, तर सुहास, संकेत, शशांक यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केले. प्रत्युत्तरादाखल खेळताना हुबळी स्पोर्ट्स क्लबने 40.1 षटकात 6 गडी बाद 135 धावा करून सामना 4 गड्यांनी जिंकला. त्यात विजय बांडे व विकास पाटील यानी प्रत्येक 2 चौकारासह 32, मनिष नरानीने 2 चौकारांसह 22, तर संकेत शेट्टीने 18 धावा केल्या. टॅलेंटतर्फे अमृत पाटीलने 37 धावात 4, प्रतिम सीएसने 35 धावात 2 गडी बाद केला.









