पत्रकार परिषदेतून केले आरोप
बेळगाव : मराठा को-ऑप. बँकेत गैरव्यवहार झाले आहेत. नोकरभरती, नवीन सॉफ्टवेअर खरेदी, इमारतीचे नूतनीकरण यामध्ये अध्यक्षांसह संचालकांनी गैरव्यवहार केले आहेत. या विरोधात आवाज उठविणाऱ्यांना बाजूला काढण्याचा प्रयत्न वेळोवेळी झाला आहे. विशेषत: महिलांसाठी ज्या पद्धतीने संचालक मंडळाची वागणूक आहे, ती पाहता ही बँक महिलांसाठी सुरक्षित नाही, असा आरोप मराठा को-ऑप. बँकेच्या माजी उपाध्यक्षा नीना काकतकर यांनी गुरुवारी आयोजित पत्रकार परिषदेत केला.
बँकेत होणाऱ्या प्रत्येक व्यवहाराची माहिती संचालकांना देणे गरजेचे असते. परंतु, महत्त्वाचे निर्णय संचालकांना अंधारात ठेऊन बँकेचे अध्यक्ष काही संचालकांना हाताशी धरून परस्पर घेत होते. बँकेच्या प्रोसिडिंगवर बैठकीपूर्वीच संचालक मंडळाच्या सह्या घेतल्या जात होत्या. त्यामुळे त्या प्रोसिडिंगवर नेमके काय लिहिले जाते? हे बैठकीनंतरच समजत होते. अध्यक्ष दिगंबर पवार यांच्या गलथान कारभाराला संचालक बाळासाहेब काकतकर यांची साथ होती. बँकेसंदर्भात कोणतीही माहिती विचारली असता जनरल मॅनेजरनी नेहमीच टाळाटाळ केली, असे त्या म्हणाल्या.
2022 मध्ये झालेल्या नोकरभरतीत तर सावळा गोंधळ दिसून आला. सरकारच्या नियमानुसार 200 मार्कांची परीक्षा होणे गरजेचे असताना केवळ 100 मार्कांची परीक्षा घेऊन निवड प्रक्रिया पूर्ण करण्याचा खटाटोप करण्यात आला. रायचूर विद्यापीठाकडून या परीक्षा घेण्यात आल्या. परंतु, परीक्षांपूर्वीच उमेदवार निश्चित करण्यात आल्याने या संपूर्ण भरतीप्रक्रियेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
यातील उमेदवारांकडून मोठी रक्कम घेतल्याच्याही चर्चा बाहेर पडू लागल्या आहेत. त्यामुळे हुशार व होतकरू उमेदवार मागे पडले. शिफारशीमुळे भरती केलेल्या उमेदवारांमुळे बँकेची प्रगती कशी काय साधली जाऊ शकते, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. निवडणूक डोळ्यासमोर ठेवून मोठ्या प्रमाणात शेअर्स करून घेण्यात आले. ज्या रिक्षाचालकांना कर्ज दिले जाते, त्यांच्या नावे भलत्यांचीच नावे घुसडून शेअर्स करण्यात आले आहेत. चेअरमन दिगंबर पवार यांच्यानंतर उपाध्यक्ष म्हणून आपल्याला चेअरमनपदाची संधी मिळणार होती. परंतु, तेथेही डावलण्यात आल्याचे त्या म्हणाल्या. थकबाकीदारांमुळे बँकेचा एनपीए वाढला होता. परंतु, कर्मचाऱ्यांच्या बोनसमधून कर्ज भरून एनपीए कमी करण्याचा प्रयत्न झाल्याचे त्यांनी सांगितले. याबाबत सहकार खात्याकडे तक्रार करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.









