ख्रिश्चन प्रसारक केए पॉल यांचा दावा : पंतप्रधानांचे मानले आभार
वृत्तसंस्था/ कोची
येमेनच्या तुरुंगात कैद भारतीय नर्स निमिषा प्रिया यांची मुक्तता केली जाणार असल्याचा दावा ख्रिश्चन प्रसारक केए पॉल यांनी केला आहे. तसेच त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आभारही मानले आहेत. ग्बोबल पीस इनीशिएटिव्हचे संस्थापक डॉ. केए पॉल यांनी मंगळवारी एका व्हिडिओ संदेशात येमेनची राजधानी सना येथील तुरुंगात कैद निमिषाचा मृत्यूदंड रद्द करण्यात आल्याचा दावा केला.
येमेनच्या नेत्यांनी मागील 10 दिवसांपर्यंत अथक प्रयत्न केले आहेत. निमिषाच्या मृत्यूदंडाला रद्द करविण्यास मदत करणाऱ्या सर्व नेत्यांचे मी आभार मानू इच्छितो. देवाच्या कृपेने निमिषाला लवकरच मुक्त केले जाईल आणि मग ती भारतात परतू शकणार आहे असा दावा पॉल यांनी केला आहे. मागील आठवड्यात भारतीय विदेश मंत्रालयाने निमिषा प्रियाला वाचविण्यासाठी उचलण्यात येणाऱ्या पावलांची माहिती दिली होती. सरकारने निमिषा प्रियाच्या परिवाराच्या मदतीसाठी एक वकीलही नियुक्त केला असुन तो येमेनच्या कायद्यानुसार मदत करत आहे. तसेच शरिया कायद्याच्या अंतर्गत निमिषाला माफी मिळवून देण्याचे प्रयत्न केले जात आहेत.
केरळचे ग्रँड मुफ्ती शेख अबुबकर अहमद कांतापुरम यांनी येमेनच्या मुस्लीम धर्मगुरुंशी चर्चा करत निमिषा प्रियाच्या मुक्ततेचे आवाहन केले होते. यानंतरच निमिषाच्या मृत्यूदंडाची अंमलबजावणी 16 जुलै रोजी टाळण्यात आली होती.
केरळच्या पलक्कड येथील रहिवासी निमिषा प्रिया 2008 साली नर्सच्या स्वरुपात काम करण्यासाठी येमेन येथे गेली होती. तेथे अनेक रुग्णालयांमध्ये काम केल्यावर निमिषा 2011 साली केरळमध्ये परतली होती आणि तिने टॉमी थॉमससोबत विवाह केला होता. दोघांना एक मुलगी असून ती सध्या केरळमध्ये आहे. तर 2015 साली निमिषाने येमेनचा नागरिक तलाल अब्दो महदीसोबत मिळून एक मेडिकल क्लीनिक सुरू केले होते. तर 2017 साली महदीचा मृतदेह एका वॉटर टँकमध्ये आढळून आला होता आणि त्याच्या हत्येचा आरोप निमिषावर झाला होता. निमिषाने झोपेच्या औषधाचा अधिक डोस देत महदीची हत्या घडवून आणल्याचा आरोप होता. याच्या एक महिन्यांनी निमिषाला येमेन-सौदी अरेबियाच्या सीमेवरून अटक करण्यात आली होती.









