हेमंत निंबाळकर यांचे नियोजन आणि संपर्कामुळे मोहीम यशस्वी : ठोस पुनर्वसन अन् विकास हमीमुळे मुख्य प्रवाहात येण्याचा मार्ग सुकर
खानापूर : राज्य सरकार व गुप्तचर पोलीस अधिकाऱ्यांच्या प्रयत्नांमुळे 20 वर्षाहून अधिक काळ नक्षलवादी भूमिका घेऊन सरकारविरोधात शासकीय यंत्रणेला आव्हान देत भूमिगत राहिलेल्या सहा जहाल नक्षलवाद्यांनी नुकतेच कर्नाटक सरकारसमोर आत्मसमर्पण केले आहे. आत्मसमर्पण करणाऱ्या नक्षलवाद्यांचे संविधानाची प्रत व गुलाबाचे फुल देऊन खुद्द मुख्यमंत्र्यांनी त्यांचे स्वागत केले आहे. ही जोखमीची प्रक्रिया पार पाडण्यासाठी राज्य गुप्तचर विभागाचे अतिरिक्त पोलीस महासंचालक हेमंत निंबाळकर यांची भूमिका महत्त्वाची आहे. त्यांच्या नियोजनानुसार ही मोहीम फत्ते झाली आहे.
राज्यातील नक्षल चळवळीची मुळे उखडून टाकण्यासाठी राज्य सरकारने नक्षल आत्मसमर्पण आणि पुनर्वसन समितीची स्थापना केली आहे. गुप्तचर विभागाच्या सहकायनि चिक्कमंगळूरच्या जंगलातील नक्षलवाद्यांना मुख्य प्रवाहात आणण्याची किमया साध्य झाली आहे. सशस्त्र क्रांतीचा मार्ग धरलेल्या सहा जहाल नक्षलींना आत्मसमर्पण करण्यास भाग पाडताना त्यांना ठोस पुनर्वसन आणि विकासाची हमी दिल्याने त्यांचा मुख्य प्रवाहात येण्याचा मार्गदेखील सुकर झाला आहे. या मोहिमेत गुप्तचर विभागाचे तत्कालीन एडीजीपी शरदचंद्र आणि सध्याचे एडीजीपी हेमंत निंबाळकर यांचे महत्त्वपूर्ण योगदान आहे.
आत्मसमर्पण केलेल्यांमध्ये लता मुंडगार, वनजाक्षी बाळेहोळे (दोघीही रा. चिक्कमंगळूर), सुंदरी कुथलूर (मंगळूर), मारेप्पा अरोली (रायचूर), जिशा (वायनाड-केरळ), के. वसंत (वेल्लोर तामिळनाडू) यांचा समावेश आहे. आत्मसमर्पण मोहिमेत हेमंत निंबाळकर यांच्या योग्य नियोजनामुळे अवघ्या 48 तासात ही प्रक्रिया पूर्णत्वाला नेली. मुख्यमंत्री सिद्धरामय्या, उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार, गृहमंत्री परमेश्वर यांच्या उपस्थितीत संविधानाची प्रत आणि गुलाबपुष्प देऊन नक्षलीचे स्वागत केले. राज्याच्या उडुपी, मंगळूर, कोडगू, हासन, चिक्कमंगळूर या जिह्यांमधील घनदाट जंगलात नक्षली कारवाया सक्रिय होत्या. तथापि गेल्या दोन वर्षापासून नक्षली कारवायांना वेग आल्याने गुप्तचर विभागाने त्यांच्या हातचलाखीवर लक्ष केंद्रीत केले होते. नक्षलवाद्यांचे मनपरिवर्तन करून त्यांना आत्मसर्पणासाठी भाग पाडण्याची कामगिरी गुप्तचर विभागाने नक्षल आत्मसमर्पण समितीच्या सहकार्याने तडीस नेली.
या धोकादायक मोहिमेत कोणताही धोका न पत्करता मोहीम यशस्वी करण्याचे नियोजन केले होते. त्यानुसार 48 तास सतत नक्षलवाद्यांसी संवाद सुरू होते. सहा नक्षलीना विश्वासात घेऊन पोलीस पथकासह त्यांना बेंगळूर येथे आणण्यात आले. हे करत असताना अत्यंत धोका पत्करुन ही मोहीम गुप्तपणे राबविली. चिक्कमंगळूर ते बेंगळूर हा प्रवासही नक्षलींच्या दृष्टीने धोकादायक असतानाही योग्य नियोजनामुळे यशस्वी झाला. पूर्वाश्रमीच्या नक्षलींच्या हस्तक्षेपामुळे काही वादाचे प्रसंगही निर्माण झाले होते. मात्र हेमंत निंबाळकर यांनी वेळीच हस्तक्षेप करून वादाला पूर्णविराम दिला आणि समर्पणाची प्रक्रिया पार पाडली. हेमंत निंबाळकर यांचे नियोजन आणि नक्षलींशी संवाद यामुळे ही मोहीम अगदी सुकरपणे पार पडली आहे.
खानापूर, बेळगावशी जिव्हाळ्याचा संबंध
हेमंत निंबाळकर 1998 बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत. कोल्हापूरचे सुपूत्र असून, बेळगाव जिल्ह्याचे पोलीसप्रमुख म्हणून त्यांनी उल्लेखनीय कार्य केले आहे. काहीकाळ एटीएस पोलीसप्रमुख म्हणूनही काम पाहिले आहे. खानापूर आणि बेळगावशी त्यांचा जिव्हाळ्याचा संबंध आहे. त्यांच्या पत्नी डॉ. अंजली निंबाळकर यांनी खानापूरच्या आमदार म्हणून नेतृत्त्वही केले आहे.









