आतापासूनच मोर्चेबांधणी सुरू : लोकसभा निवडणुकीत राज्यातून जास्तीत जास्त खासदार निवडून आणण्यासाठी काँग्रेसने कंबर कसली
खानापूर : येत्या लोकसभा निवडणुकीसाठी उत्तर कन्नडा मतदार संघात काँग्रेस विजयी होण्यासाठी प्रयत्नशील आहे. लोकसभा निवडणुकीत राज्यातून जास्तीत जास्त खासदार निवडून आणण्यासाठी काँग्रेसने कंबर कसली असून त्यासाठी आतापासूनच मोर्चेबांधणी सुरू आहे. उमेदवार चाचपणी तसेच निवडून येणाऱ्या उमेदवारालाच उमेदवारी देण्यासाठी काँग्रेस विचार करत आहे. उत्तर कन्नडा मतदार क्षेत्रात गेल्या चार निवडणुकीत भाजपने बाजी मारली आहे. मात्र येणाऱ्या निवडणुकीत काँग्रेसने या मतदारक्षेत्रात काँग्रेसचा खासदार पाठवण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरू केले आहेत. उत्तर कन्नड मतदार क्षेत्रात एकूण आठ आमदार येत असून यात भटकळ, शिर्शी, कुमठा, अंकोला, यल्लापूर, कित्तूर आणि खानापूर हे मतदार क्षेत्र येतात. हे सहा मतदार क्षेत्र कारवार जिल्ह्यातील असून कित्तूर आणि खानापूर ही दोन मतदार क्षेत्रे बेळगाव जिल्ह्यातील आहेत.
उत्तर कन्नडा मतदार क्षेत्राचा विचार केल्यास 99 साली मार्गारेट अल्वा काँग्रेसच्या उमेदवार विजयी झाल्या होत्या. त्यानंतर भाजपचे अनंतकुमार हेगडे हे सलग निवडून येत आहेत. यापूर्वी 96 ते 98 या काळात खासदार अनंतकुमार हेगडे हे निवडून आले होते. त्यापूर्वी 1980 ते 96 या काळात देवराय नाईक हे काँग्रेसचे खासदार निवडून आले होते. आता होणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीत उत्तर कन्नडा मतदार क्षेत्रातून काँग्रेसमधून अनेकजण इच्छूक आहेत. यात माजी आमदार अंजली निंबाळकर यांचे नाव आघाडीवर आहे. काँग्रेस उमेदवार निवडताना आर्थिक सदृढ असलेला उमेदवारच उतरवण्याची तयारी चालवली आहे. काँग्रेसच्या पक्षश्रेष्ठींनी आर. व्ही. देशपांडे यांना यावेळी मंत्रीपद दिलेले नाही. त्यांना काँग्रेसतर्फे कारवार मतदार संघाची उमेदवारी देऊन त्यांना केंद्रात बोलवण्याचा विचार सुरू असल्याची चर्चाही आहे. मात्र याबाबत आर. व्ही. देशपांडे यांनी कुठलेही मत व्यक्त केलेले नाही. मात्र त्यांचे चिरंजीव मागीलवेळी स्पर्धेत होते. उत्तर कन्नडा मतदार क्षेत्रात काँग्रेसचे आमदार मोठ्या संख्येने असल्याने यावेळी काँग्रेसला विजयाची खात्री आहे. त्यामुळेच माजी आमदार अंजली निंबाळकर यांच्या नावाचीही चर्चा जोरात आहे.
खानापूर, कित्तूर, हल्याळ मतदार क्षेत्रात मोठा जनसंपर्क
खानापूर, कित्तूर आणि हल्याळ मतदार क्षेत्रात त्यांचा संपर्क असल्याने तसेच ते मराठा असल्याने या मतदारसंघात मराठा मतदारांची संख्या मोठ्या प्रमाणात असल्याने त्यांचा विचार पक्षश्रेष्ठी करतील, अशी चर्चा सुरू आहे. तसेच या मतदार संघात अल्पसंख्याक आणि ख्रिश्चन यांचे मतदान हे निर्णायक ठरणार असून अंजली निंबाळकर यांच्या पाठीशी मराठा मतदार उभे राहिल्यास त्यांना विजयाची खात्री आहे.
भाजपचे खासदार अनंतकुमार हेगडेंबाबत मतदारांत नाराजी
भाजपचे खासदार अनंतकुमार हेगडे हे यावेळची निवडणूक लढवणार नाहीत.गेल्या चार-पाच निवडणुकांचा अनुभव पाहता त्यांचा लोकसंपर्क व कामे करण्याची पद्धत यामुळे त्यांच्याबाबत नाराजी व्यक्त होत आहे. खानापूर मतदारक्षेत्रात एकूण खानापूरकडे साफ दुर्लक्ष केलेले आहे. त्यामुळे खासदाराबद्दल प्रचंड प्रमाणात नाराजी व्यक्त होत आहे. त्यांनी आपल्या आठवेळा खासदारकीच्या कार्यकाळात खानापूरसाठी कोणतीही भरीव योजना अथवा अनुदान दिलेले नाही. मात्र गेल्या दोन निवडणुकीत मोदींच्या नावावर ते निवडून आलेले आहेत. मात्र या वेळेला त्यांच्याबाबत भाजपमधूनच विरोध होत असल्याने त्यांनी निवडणूक न लढवण्याचा विचार व्यक्त केलेला आहे. त्यासाठी काँग्रेसमधून विजयी उमेदवार देण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. अंजली निंबाळकर यांनीही जरी खासदारकी लढण्यासाठी होकार दिला नसला तरीही त्या खासदारकीसाठी इच्छुक असल्याचीही चर्चा मतदारातून होत आहे. अंजली निंबाळकर यांना पक्षश्रेष्ठींचा तसेच दिल्ली गांधी कुटुंबीयांचीही जवळीक आहे. तोही फायदा निंबाळकर यांना होऊ शकतो. राहुल गांधी यांच्या पदयात्रेत त्या स्वत: चालल्या होत्या. तसेच प्रियांका गांधी त्यांच्या प्रचारासाठी खानापुरात आलेल्या होत्या. त्याचबरोबर त्यांचे मामा अशोक चव्हाण यांचा गांधी कुटुंबीयाशी असलेली जवळीक हे सर्व पाहता निंबाळकर यांना कारवार मतदार संघाची उमेदवारी मिळण्याची दाट शक्मयता व्यक्त होत आहे.









