वार्ताहर/सांबरा
निलजी येथे दुर्गामाता दौडला जोरदार प्रारंभ झाला आहे. दौडनिमित्त गावामध्ये सर्वत्र भगव्या पताका व ध्वज लावण्यात आल्याने अवघे गाव भगवेमय झाले आहे दुर्गामाता दौड व नवरात्रोत्सवानिमित्त मुख्य महाद्वारपासून गावातील सर्व मंदिरांना आकर्षक विद्युत रोषणाई केली आहे. त्यानिमित्त गावामध्ये महिलांनी आकर्षक रांगोळ्या काढून दौडचे स्वागत केले. दौडमधील धारकऱ्यांना दररोज प्रसादाचे वाटपही करण्यात येत आहे. पहाटे शिवाजी महाराज व शंभू महाराजांच्या मूर्तींचे पूजन करून गावातील सर्व गल्ल्यातून दौड मार्गक्रमण करत आहे. महिला वर्गाकडून आरती ओवाळून दौडचे स्वागत करण्यात येत आहे. गुरुवारी मुतगा, कंचवीरनगर, गोकुळ नगर परिसरातून दौड काढण्यात आली. दौडमध्ये अनेक वारकरी, धारकरी, तरुणासह असंख्य माता-भगिनी व बालचमूंनी सहभाग दर्शविला होता.









