आगामी काळात अध्यक्ष-उपाध्यक्षाची नव्याने होणार निवड : राजकीय घडामोडींना कलाटणी
संकेश्वर : जिल्ह्यात नावलौकीक असलेल्या हिरण्यकेशी सहकारी साखर कारखान्याच्या चेअरमनपदाचा राजीनामा चेअरमन व हुक्केरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार निखिल कत्ती यांनी दिला. 24 रोजी सायंकाळी हिरण्यकेशीच्या सभागृहात आयोजित केलेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत कार्यकारी संचालक साताप्पा करकीनाईक यांच्याकडे राजीनामा पत्र देण्यात आल्याची माहिती ‘तरुण भारत’शी बोलताना आमदार निखिल कत्ती यांनी दिली. यासंदर्भात समजलेली माहिती अशी, 23 सप्टेंबर रोजी हिरण्यकेशी सहकारी साखर कारखान्याच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत हिरण्यकेशी लिजवर देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. यानंतर काही संचालकांनी हिरण्यकेशी लिजवर देण्यास विरोध दर्शवत संचालक मंडळाच्या नेतृत्वातूनच हिरण्यकेशी चालवूया, असा निर्णय घेत गत दोन महिन्यांपासून संचालक मंडळात मतभिन्नतेचे वातावरण निर्माण झाले होते. याचे पर्यवसान शुक्रवारी तातडीने बोलावलेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत चेअरमन निखिल कत्ती यांनी राजीनामा देण्यापर्यंत झाले आहे.
निखिल कत्ती यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, आमदारकीची जबाबदारी वाढल्यामुळे व लोकसंपर्काच्या कामगिरीमुळे लोकांना दिलेल्या विश्वासाला पात्र होण्यासाठी आमदार या नात्याने मी त्यांना न्याय दिला पाहिजे. यामुळे माझ्यावर असणारी हिरण्यकेशीच्या अध्यक्षपदाची जबाबदारी मी स्वच्छेने राजीनामा देऊन या जबाबदारीतून मुक्त झालो आहे. आगामी 15 दिवसांत निवड होणाऱ्या नूतन अध्यक्ष व उपाध्यक्ष यांच्या नेतृत्वाखाली कारखाना सुरळीत सुरू करण्यात आपण सहकार्य करणार आहोत यात शंका नाही. कारखाना चालवण्यासाठी नूतन अध्यक्ष-उपाध्यक्षांच्या आर्थिक नियोजनातून कारखान्याची प्रगती साधण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. कारखान्यावर जे कर्ज आहे ते कर्ज कारखान्याच्या आर्थिक उत्पन्नातून परतफेड करीत नव्या उमेदीने कारखाना उभा करण्याचा सर्व संचालक प्रयत्न करणार आहेत. संचालक मंडळात कोणतेही गट तट नसून कारखाना कर्जमुक्त करण्यासह कारखान्याची प्रगती साधण्याचा प्रयत्न केला जाणार असल्याचे यावेळी त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, हिरण्यकेशी सहकारी साखर कारखान्याच्या 64 वर्षांच्या इतिहासात हिरण्यकेशी लिजवर देण्याचा पहिल्यादांच निर्णय झाला व यानंतरच्या घडामोडीत चेअरमननी राजीनामा देण्याची वेळ आली. ही कारखान्याच्या इतिहासातील पहिलीच घटना आहे. सहकार महर्षी अप्पणगौडा पाटील यांनी मोठ्या उमेदीने हा कारखाना शेतकऱ्यांचा कामधेनू ठरावा, या उद्देशाने उभा केला होता. अलिकडच्या 30 वर्षानंतर कारखान्यावर कर्जाचा डोंगर वाढत जात असल्यामुळे हे कुठेतरी थांबायला हवे या उद्देशाने वार्षिक सर्वसाधारण सभेत कारखाना लिजवर देण्याचा निर्णय घेण्यात आला. एकूण संचालकापैकी बहुसंख्य संचालकांना हे मान्य नसल्यामुळे कारखाना लिजवर देण्याचा निर्णय थकीत ठेवत कारखाना स्वयंस्फूर्तीने संचालकाकरवी चालवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे जिल्ह्याच्या साखर उद्योगासह राजकारणात चर्चेला उधाण आले आहे.









