वृत्तसंस्था / ग्रेटर नोयडा
भारताची ऑलिम्पिक महिला मुष्टीयोद्धी निखत झरीनचे मुष्टीयुद्ध क्षेत्रातील पुनरागमन मे महिन्यात होणार आहे. गुडघ्याला झालेल्या दुखापतीमुळे तिला पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेनंतर या क्षेत्रापासून अलिप्त रहावे लागले होते.
28 वर्षीय निखत झरीनने यापूर्वी दोनवेळा आपल्या वजन गटातून विश्व विजेतेपद मिळविले आहे. आता ती 2028 च्या लॉस एन्जिल्स ऑलिम्पिकसाठी भारताला पदक मिळवून देण्याकरिता सज्ज झाली आहे. गुडघ्याला झालेल्या दुखापतीतून ती आता जवळपास पूर्णपणे तंदुरुस्त झाली आहे. येत्या सप्टेंबर महिन्यात विश्व मुष्टीयुद्ध चॅम्पियनशिप स्पर्धा होणार असून त्यानंतर विश्व चषक मुष्टीयुद्ध स्पर्धा भारतामध्ये खेळविली जाणार आहे. या दोन्ही स्पर्धांसाठी झरीनने जोरदार सराव सुरू केला आहे. पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत निखतचे पदार्पण होते. पण तिला चीनच्या यु कडून पराभव पत्करावा लागला होता. येत्या ऑगस्ट महिन्यात होणाऱ्या महिलांच्या राष्ट्रीय मुष्टीयुद्ध चॅम्पियनशिप स्पर्धेत निखत सहभागी होत आहे.









