वृत्तसंस्था/ लिव्हरपूल, इंग्लंड
भारताच्या बॉक्सर्सनी येथे असलेल्या वर्ल्ड बॉक्सिंग चॅम्पियनशिमध्ये आपला ठसा उमटवणारी कामगिरी पुढे चालू ठेवली असून निखत झरीन, नरेंदर व जस्मिन यांनी शानदार विजय मिळवित शेवटच्या सोळा फेरीत स्थान मिळविले.
महिलांच्या 51 किलो वजन गटात निखत झरीनने पुन्हा एकदा आपला दर्जा दाखवून देत अमेरिकेच्या लोझॅनो जेनिफरवर 5-0 अशी एकतर्फी मात केली. पुरुषांच्या 90 किलोवरील गटात नरेंदरने जबरदस्त प्रदर्शन करीत आयर्लंडच्या मॅकडोनाग मार्टिन ख्रिस्तोफरवर 4-1 अशी मात करीत पुढील फेरी गाठली. महिलांच्या 57 किलो गटात जस्मिननेही सफाईदार प्रदर्शन करीत युक्रेनच्या हुतारिना दारिया ओल्हाचा 5-0 असा पराभव करून आगेकूच केली.
तत्पूर्वी पुरुषांच्या 75 किलो वजन गटातील लढतीत सुमित कुंडूने तर महिलांच्या 65 किलो गटात नीरज फोगटने प्रतिस्पर्ध्यांवर विजय मिळवित उपउपांत्यपूर्व फेरीत स्थान मिळविले. सुमितला जॉर्डनच्या मोहम्मद अलहुसेनवर विजय मिळविण्यासाठी फारसा संघर्ष करावा लागला नाही. पहिल्या फेरीच्या या लढतीत त्याने 5-0 असा विजय मिळविला. महिलांमध्ये नीरज फोगटला मात्र विजयासाठी संघर्ष करावा लागला. तिने फिनलंडच्या क्रिस्टा कोव्हालेनेनवर 3-2 अशी निसटती मात केली.
भारताने या पहिल्या वर्ल्ड चॅम्पियनशिप स्पर्धेसाठी 20 सदस्यीय पथक पाठवले असून वर्ल्ड बॉक्सिंगच्या देखरेखीखाली ही स्पर्धा होत आहे. भारताने ब्राझील व कझाकस्तान येथील स्पर्धेत चांगले प्रदर्शन केले होते.









