कर्नाटक विधानसभा निवडणुकीचा आज फैसला : मतदारांचा कौल कोणाच्या बाजूने याविषयी उत्सुकता
प्रतिनिधी/ बेंगळूर
तीव्र चुरस, अटीतटीच्या लढती आणि सत्तेसाठी संघर्ष या दरम्यान कर्नाटक विधानसभेसाठी झालेल्या निवडणुकीचा निकाल शनिवारी लागणार आहे. मतदार कोणत्या पक्षाला जनादेश देणार?, रथी-महारथींचे राजकीय भवितव्य काय असेल, याचे चित्र मतमोजणीनंतरच स्पष्ट होईल. राज्यातील 36 केंद्रांवर शनिवारी सकाळी 8 वाजता मतमोजणीला प्रारंभ होणार आहे. दुपारपर्यंत निवडणूक रिंगणातील 2,615 उमेदवारांच्या राजकीय भवितव्यावर शिक्कामोर्तब होईल.

कर्नाटकातील मतमोजणीकडे देशवासियांचे लक्ष लागले असून प्रत्येकजण चातकाप्रमाणे निकालाची वाट पाहत आहे. मतदारांचा कौल कोणाच्या बाजूने लागतो, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. राज्यातील 224 मतदारसंघांसाठी 10 मे रोजी एकाच टप्प्यात मतदान झाले होते. राज्यात एकूण 73.19 टक्के मतदानाची नोंद झाली. आता शनिवारी सकाळी 8 वाजल्यापासून राज्यातील सर्व केंद्रांवर एकाचवेळी मतमोजणीला सुऊवात होणार असून दुपारपर्यंत निकाल हाती येतील. दुपारी दोनच्या सुमारास कोणत्या पक्षाचे सरकार स्थापन होणार किंवा त्रिशंकू विधानसभा अस्तित्वात येईल, हे समजणार आहे.
मतमोजणीची सर्व तयारी
राज्यात शांततेत मतदान पार पडल्यानंतर निवडणूक आयोगाने मतमोजणीसाठी सर्व तयारी केली आहे. प्रत्येक विधानसभा मतदारसंघातील मतमोजणी संबंधित जिल्ह्याच्या ठिकाणी निश्चित केलेल्या केंद्रांवर स्वतंत्रपणे केली जाईल. सकाळी 7:30 पासूनच स्ट्राँग रुममध्ये ठेवण्यात आलेल्या इलेक्ट्रॉनिक व्होटींग मशिन्स बाहेर काढल्या जातील. 8 वाजता मतमोजणीला प्रारंभ होईल. बेंगळूरमध्ये 4 केंद्रांवर मतमोजणी होणार आहे.
प्रत्येक खोलीसाठी 10 ते 14 टेबलांची व्यवस्था करण्यात आली असून, मतमोजणीसाठी आवश्यक कर्मचारी पुरविण्यात आले आहेत. मतमोजणी केंद्रांवर पोलीस कर्मचारी नियुक्त करण्यात आले असून सीसीटीव्ही पॅमेरे बसविण्यात आले आहेत. तीन टप्प्यात ही सुरक्षा व्यवस्था आहे. मद्यविक्रीवरही शनिवारी सायंकाळपर्यंत बंदी घालण्यात आली असून मतमोजणी केंद्राच्या 100 मीटर परिसरात जमावबंदी लागू करण्यात आली आहे.
राज्यात….
विधानसभा मतदारसंघ 224
मतमोजणी केंद्रे 36
मतमोजणी कक्ष 306
मतमोजणीसाठी टेबल 4,256
मतमोजणी पर्यवेक्षक 4,256
मतमोजणी साहाय्यक 4,256
सूक्ष्म निरीक्षक 4,256









