वृत्तसंस्था/नवी दिल्ली
ईस्पोर्ट्स आणि गेमिंग कंटेंटमधील जागतिक पॉवरहाऊस असलेल्या ‘एस8यूएल’ ईस्पोर्ट्सचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या ग्रँडमास्टर निहाल सरिनने शानदार पुनरागमन करत सौदी अरेबियातील रियाध येथे सुरू असलेल्या ईस्पोर्ट्स वर्ल्ड कप 2025 मध्ये बुद्धिबळ प्लेऑफसाठी पात्रता मिळवली आहे. गट स्तरावरील पहिल्या दिवशी सहकारी भारतीय ग्रँडमास्टर अर्जुन एरिगेसीकडून 0-2 असा पराभव पत्करल्यानंतर निहालने दुसऱ्या दिवशी जोरदार पुनरागमन केले. त्याच्या वेगवान निर्णयक्षमतेचे प्रदर्शन करत त्याने गटातील उपांत्य सामन्यात डच ग्रँडमास्टर अनीश गिरीवर 2-0 असा विजय मिळवला.
गटातील अंतिम सामन्यात या 21 वर्षीय खेळाडूचा सामना फ्रेंच ग्रँडमास्टर मॅक्सिम वाचियर-लाग्राव्हशी झाला. पहिल्या गेममध्ये कठीण स्थितीत असतानाही त्याने बरोबरी साधली आणि दुसऱ्या गेममध्ये निर्णायक विजय मिळवून सामना 1.5-0.5 असा जिंकला. यासह निहालने ‘गट 2’मधून प्लेऑफमध्ये स्थान मिळवले आहे आणि क्वार्टर फायनलमध्ये तो पाच वेळचा विश्वविजेता मॅग्नस कार्लसनशी सामना करेल. ‘ईडब्ल्यूसी’ बुद्धिबळ क्वार्टर फायनलच्या प्रत्येक सामन्यात चार रॅपिड गेम असतील.
सेमीफायनलमध्ये तीव्रता वाढून त्यामध्ये प्रत्येक सामन्यात सहा गेम असतील आणि शेवट ‘बेस्ट-ऑफ-सिक्स सेट’ पद्धतीने खेळल्या जाणार असलेल्या अंतिम लढतीने होईल. विजेत्यांसाठी 1.5 दशलक्ष डॉलर्स (अंदाजे 12.9 कोटी रु.) आणि 2 लाख 50 हजार डॉलर्स (सुमारे 2.1 कोटी रु.) अशी मोठी बक्षिसे या स्पर्धेत ठेवण्यात आलेली असून रोमांचक लढती पाहायला मिळण्याची चिन्हे येथे दित आहेत. ‘प्लेऑफमध्ये पोहोचणे खूप छान वाटते, विशेषत: अनीश आणि मॅक्सिम या दोघांविऊद्धच्या अशा चुरशीच्या सामन्यांनंतर. दोन्ही सामन्यांनी माझी खरोखरच परीक्षा घेतली, परंतु मला आनंद आहे की, जेव्हा सर्वाधिक गरज होती तेव्हा मला माझी लय सापडली.









