कळंगुटच्या वयोवृद्ध टॅक्सी चालकावर जीवघेणा हल्ला : पर्यटक बनून आलेल्यांकडून टॅक्सी चोरण्याचा प्रयत्न
पेडणे : कळंगुट येथील 65 वर्षीय टॅक्सी चालक संजीवन कृष्णा वेंगुर्लेकर यांच्यावर बुधवारी रात्री मालपे-पेडणे परिसरात पाच ते सहा अज्ञातांनी धारदार शस्त्राने प्राणघातक हल्ला केला. या हल्ल्यात ते गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर सध्या इस्पितळात उपचार सुरू आहेत. संशयित आरोपींनी कळंगुट ते बांद्यापर्यंत भाड्याचे कारण सांगून वेंगुर्लेकर यांची टॅक्सी भाड्याने घेतली. ते रात्री 8.45 ते 9 या दरम्यान मालपे-न्हईबाग रस्त्यावरील राष्ट्रीय महामार्ग 66 वर पोहोचताच, सर्व संशयितांनी वेंगुर्लेकर यांना पकडले आणि त्यांच्या चेहऱ्यावर, डोक्यावर, खांद्यावर आणि हातावर धारदार शस्त्राने वार केले.
आरोपींनी हा हल्ला वेंगुर्लेकर यांची अर्टिगा कार जी ए.03 डब्ल्यू 4180 चोरण्याच्या उद्देशाने केला. मात्र, जखमी अवस्थेतही वेंगुर्लेकर यांनी प्रतिकार केला. घटनास्थळी रक्ताने माखलेल्या अवस्थेत सापडलेले वेंगुर्लेकर यांच्यावर सध्या गोमेकॉत उपचार सुरू असून त्यांच्या प्रकृतीवर डॉक्टर लक्ष ठेवून आहेत. या घटनेनंतर पेडणे पोलिसस्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भा.न्या.सं.च्या 310 (2), 311, 312 सह 3 (5) कलमांतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पेडणे पोलिसांनी तपास सुरू केला असून एका संशयिताला ताब्यात घेण्यात आले आहे. उर्वरित आरोपींच्या शोधात गोवा पोलिसांची चार तपासपथके महाराष्ट्रात पाठवण्यात आली आहेत. याप्रकरणी पेडणे पोलिसस्थानकाचे निरीक्षक सचिन लोकरे यांच्या नेतृत्वाखाली उपनिरीक्षक विवेक हळर्णकर पुढील तपास करीत आहेत. मालपे येथे असलेली अर्टिगा टुरिस्ट गाडी पेडणे पोलिसांनी ताब्यात घेतली आहे.









