भारताला दिला झटका : लढाऊ हेलिकॉप्टर खरेदी करणार
वृत्तसंस्था/ अबूजा
जी-20 शिखर परिषदेदरम्यान भारतासोबत मैत्री वाढविण्याचे आश्वासन देणारा आफ्रिकन देश नायजेरियाने मोठा झटका दिला आहे. नायजेरियाच्या सैन्याने बोको हरामच्या दहशतवाद्यांचे आव्हान मोडून काढण्यासाठी तुर्कियेसोबत हातमिळवणी केली आहे. नायजेरियाने तुर्कियेकडून लढाऊ हेलिकॉप्टर्सची खरेदी केली आहे. यापूर्वी नायजेरियाने भारताच्या प्रचंड आणि ध्रूव हेलिकॉप्टर्समध्ये रुची दाखविली होती. परंतु आता त्याने भारताऐवजी तुर्कियेसोबत करार केला आहे.
आफ्रिकेत नायजेरियाच्या सैन्याचे प्रभुत्व कायम रहावे याकरता तो देश प्रयत्नशील आहे. याचमुळे त्याने तुर्कियेच्या घातक हेलिकॉप्टरची निवड केली आहे. तुर्किये आणि नायजेरियात या देशांदरम्यान यासंबंधी दोन वर्षांपासून चर्चा सुरू होती. नायजेरियाने तुर्कियेकडून 6 टीएआय टी-129 लढाऊ हेलिकॉप्टर्स खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. याकरता तुर्कियेला 4.5 कोटी डॉलर्सची रक्कम द्यावी लागणार आहे.
नायजेरियाने बोको हराम विरोधी लढ्यासाठी चीनकडून विंग लूंग 2 ड्रोन खरेदी केला आहे. परंतु आगामी काळात बोको हरामकडून असलेला धोका वाढण्याची शक्यता पाहता नायजेरियाने लढाऊ हेलिकॉप्टर देखील खरेदी केले आहे. नायजेरियासोबतचा हा हेलिकॉप्टर करार तुर्कियेसाठी मोठे यश आहे. दोन इंजिन असलेल्या टी-129 हेलिकॉप्टरची निर्मिती तुर्कियेची कंपनी टीएआय आणि इटलीची कंपनी ऑगस्टा वेस्टलँडने मिळून केली आहे. फिलिपाईन्सने देखील हे लढाऊ हेलिकॉप्टर खरेदी केले आहे.









