मणिपूरचे मुख्यमंत्री, माजी फुटबॉलपटू आणि माजी पत्रकार एन. बिरेनसिंह यांनी अखेर आपल्या पदाचा राजीनामा राज्यपालांच्याकडे सोपवला आहे. 14 आमदार आणि भाजप नेते संदीप पात्रा यांच्यासोबत जाऊन त्यांनी राजीनामा सोपवला. याचा अर्थच ते तेव्हाही सहजासहजी खुर्ची सोडायला तयार नसावेत. दिल्लीत बोलवून त्यांना राजीनामा द्यायला सांगितला गेला आणि देतात की नाही हे पाहणीसाठी पात्रा यांना मुराळी म्हणून पाठविले गेले. मणिपूर विधानसभेत काँग्रेसने आणलेल्या अविश्वास ठरावानंतर परिस्थिती इतकी बिकट बनली की त्यांना काढून टाकले असे न भासवता पद सोडायला लावण्यात आले असावे हे स्पष्टपणे दिसते. तब्बल 34 महिने मणिपूर जातीय दंगलीत होरपळतो आहे. या दरम्यान अनेक प्रसंग आले जेव्हा केंद्र सरकारनेच त्यांना पदावरून हाकलून लावले पाहिजे होते. आपला राजकीय स्वार्थ साधण्यासाठी दोन जातींमध्ये प्रचंड तेढ निर्माण करून पोळी भाजून घेण्याच्या प्रयत्नात सगळे मणिपूर भाजले आणि मुख्यमंत्र्यांचे तोंडही काळवंडले असे म्हणावे लागेल. पण हे सगळे इतक्यावर थांबले नाही. गेल्या लोकसभेच्या शेवटच्या अधिवेशनात पंतप्रधान मोदी यांच्यावर विरोधकांनी अविश्वास ठराव आणला. तो फेटाळला जाणार हे माहीत असताना देखील त्यावर राष्ट्रीय चर्चा घडविण्यासाठी ते करावे लागले. मणिपुरी महिलांची भर रस्त्यात झालेली विटंबना, कारगिल युध्दातील वीर सेनानीने मी देश वाचवला पण पत्नीची अब्रू वाचवू शकलो नाही अशा शब्दात व्यक्त केलेला शोक संपूर्ण देशाला अस्वस्थ करून गेला. पण जो याने अस्वस्थ व्हायला हवा होता तो तिथला राज्यकर्ता वीरेंद्र सिंह मात्र आपण राजीनामा देणार नाही याच मतावर ठाम राहिले. बरं पदावर बसून त्यांनी परिस्थिती शांत केली असेही झाले नाही. अविश्वास ठरावावर बोलताना पंतप्रधानांनी मणिपूर शांत होत आहे असा दावा केला. मात्र निर्वासितांच्या छावण्यांमध्ये परिस्थिती बदलली नाही. उलट घरे जळलेली, आपली माणसे हरवलेली गर्दी त्या छावण्यांमध्ये वाढतच राहिली. पंतप्रधान बोलले तरी त्यांना देण्यात आलेली माहिती चुकीची असल्याचे पुढे स्पष्ट झाले. लोकसभा निवडणूक निकाल हाती पडल्यावर भाजपच्या राष्ट्रीय मार्गदर्शक सरसंघचालक मोहन भागवत यांनीही मणिपूर शांत व्हायची वाट पाहतंय, त्याला प्राधान्य दिले पाहिजे अशी सरकारला आणि मोदी यांना आठवण करून दिली. ही मोठी नामुष्की ओढवली ती मणिपूरच्या मुख्यमंत्री महोदयांच्या कारभारामुळे. एक राष्ट्रीय फुटबॉलपटू आणि कधीकाळी मणिपूरातील तरुणांच्या मनातील शब्द कागदावर उतरवून त्यांनी आपले महत्त्व निर्माण केले होते. मात्र 2017 पासून मुख्यमंत्री पदावर विराजमान झाल्यानंतर ही खुर्ची प्रदीर्घकाळ आपल्या बुडाखालून हलली नाही पाहिजे यासाठी त्यांनी ज्या पद्धतीचे राजकारण केले आणि त्याच काळात ज्या पद्धतीने वातावरण बिघडत गेले त्यामुळे मणिपूरची परिस्थिती खूपच दयनीय झाली. 3 मे 2023 या तारखेपासून मैतेयी आणि कुकी या दोन जातींमध्ये भडकलेला हिंसाचार सर्वसामान्यांना आगीत लोटणारा ठरला. अनेक स्त्रियांचे झालेले विनयभंग आणि दुष्कृत्ये संपूर्ण जगात धिक्कारली गेली. मात्र तरीसुद्धा गुळाला मुंगळा चिकटल्याप्रमाणे एन. बिरेनसिंह आपल्या पदाला कवटाळून राहिले. राज्यातील मंत्र्यांची, आमदारांची घरे लोकांनी पेटवली, सर्व घटकातील माणसांचे विस्थापन या काळात मणिपूरने अनुभवले. यात किती मेले आणि किती जळून कोळसा झाले याची मोजणी करणे अवघड. अशा काळात तिथली परिस्थिती हाताळण्यासाठी केंद्रीय गृहमंत्र्यांना सुद्धा अपयश आले आणि खुद्द पंतप्रधानांना एकदा मणिपूरला जाऊन दाखवा असे आव्हान दररोज दिले जाऊ लागले. दुर्दैवाची गोष्ट म्हणजे पंतप्रधानांना खरोखरच मणिपूरमध्ये जाणे मुश्किल झाले आहे. दोन जातींमध्ये इतका तणाव वाढला आहे की त्यामध्ये कोणाचीही बाजू घेणे किंवा कोणालाही समजावून सांगणे हे केंद्र सरकारच्या हाताबाहेर गेलेले आहे. या जनतेला विश्वास तरी द्यायचा कसा आणि त्यांचा राग शांत करून त्यांना सामान्य जीवन जगण्यास तयार तरी कसे करायचे? हा आज देशासमोर प्रश्न निर्माण झाला आहे. एखाद्या प्रकरणात विरोधकांनी राजकारण करू नये असे आवाहन सत्ता पक्ष करत असतो. पण, या प्रकरणात राजकारण केले नसते तरीसुद्धा सत्ता पक्षाला काही मार्ग काढता येईल अशी वाटच मोकळी राहिली नव्हती. लोक ज्या पध्दतीने एकमेकांच्या जीवावर उठले आहेत यातून वाचणार कोण आणि परिस्थिती सुधारणार कशी? याचे उत्तर आज देखील कोणाकडे नाही. एन. बिरेनसिंह यांच्या राजीनाम्यानंतर एखादा गट तरी शांत व्हावा अशी अपेक्षा आहे. आपल्या राजकारणासाठी लोकांमध्ये तेढ निर्माण करणे सोयीचे असते. पण, आग भडकल्यानंतर तो वाद हाताळणे हा नेतृत्वाच्याही आवाक्याचा भाग राहत नाही. मणिपूरमध्ये योग्य वेळेला राज्यकर्त्यांनी आपली भूमिका समजून हस्तक्षेप केला असता तर ही वेळ आली नसती. आता इथे एकाच राज्यात दोन देशांच्या प्रमाणे सीमा निर्माण झाली आहे. हाती शस्त्र असलेले दोन समाजाचे लोक आपापला भाग वाचवत असल्याच्या आविर्भावात हिंसक घटना घडवत चालले आहेत. माध्यमे जरी याकडे दुर्लक्ष करत असली तरी समाज माध्यमावर या गोष्टी आता लपून राहिलेल्या नाहीत. सर्वसामान्य आणि निष्पाप लोक यात हकनाक बळी गेले आहेत. जात आहेत. सगळीकडे एक प्रकारची दहशत आहे. जळलेली घरे, इमारती, वाहने, काळवंडलेला भोवताल घेऊन एक असुरक्षित जीवन तिथे लोक जगत आहेत. कधी हिंसा सुरू होईल आणि कधी जीव जातील याचे डोंगरी आणि मैदानी दोन्ही भागात निश्चितपणे सांगणे मुश्किल झाले आहे. इतके कटू अनुभव घेतल्यानंतर लोकांची मने सांधणे जवळपास मुश्किल आहे. एन. बिरेनसिंह गेले तरी त्यांचा दुर्दैवी सत्ताकाळ त्या प्रदेशाला नेहमीच एका निगरगट्ट राजकारण्याची आठवण देत राहील ज्याने आपल्या भागाचे नरकात रूपांतर केले.








