सेन्सेक्स 51 अंकांनी घसरलाः टाटा स्टील, नेस्ले नफ्यात
वृत्तसंस्था/ मुंबई
भारताच्या किरकोळ महागाई दराच्या घोषणेच्या पार्श्वभूमीवर भारतीय शेअरबाजार आठवडय़ाच्या पहिल्या दिवशी दोलायमान स्थितीत होता. सेन्सेक्स घसरणीत तर निफ्टी निर्देशांक मात्र स्थिर बंद झाल्याचे दिसून आले.
सोमवारी सरतेशेवटी मुंबई शेअरबाजाराचा 30 समभागांचा सेन्सेक्स निर्देशांक 51 अंकांच्या घसरणीसह 62,130 अंकांवर बंद झाला. दुसरीकडे राष्ट्रीय शेअरबाजाराचा निफ्टी निर्देशांक मात्र 18,497 अंकांवर न बदलता बंद झाला. सेन्सेक्सचा निर्देशांक इंट्रा डे दरम्यान 61,676 अंकांपर्यंत घसरला होता तर निफ्टी निर्देशांकही एकावेळी 18,346 पर्यंत घसरला होता. बाजाराला खऱया अर्थाने आर्थिक क्षेत्रातील कंपन्या आणि धातू कंपन्यांनी काहीसा आधार दिला. हे दोन्ही निर्देशांक अनुक्रमे 0.2 टक्के, 0.4 टक्के इतके वधारलेले दिसले. आयटी निर्देशांक मात्र 0.4 टक्के घसरलेला होता. मिडकॅप आणि स्मॉलकॅप निर्देशांक 0.3 टक्के वधारलेले पाहायला मिळाले. याच दरम्यान शेअरबाजारात सोमवारी युनिपार्ट्स इंडिया यांचा समभाग बाजारात लिस्ट झाला. 575 रुपयांसह सदरचा समभाग बीएसई-एनएसईवर लाँच झाला. इश्यू किमतीपेक्षा हा समभाग 6 टक्के घसरत 537 रुपयांवर बंद झाला. सुला वाईन यार्डच्या आयपीओला विपेत्यांनी दुपारी 3.30 पर्यंत 19 टक्के इतका प्रतिसाद दिला होता.
अमेरिकेतील फेडरल रिझर्व्ह बँकेच्या धोरणाच्या निर्णयाच्या पार्श्वभूमीवर भारतीय शेअरबाजार काहीसा सावधगिरी बाळगत व्यवहार करत होता. डॉलर्सच्या तुलनेत भारतीय रुपयाही कमकुवत होताना दिसला. भारतीय रुपया 0.32 टक्के इतका घसरत 82.53 वर व्यवहार करत होता. आयटी समभाग सोमवारीही घसरणीतच व्यवहार करत होते. यामध्ये मोठय़ा प्रमाणात विक्री दिसून आली. समभागांचा विचार करता टाटा स्टील, नेस्ले इंडिया आणि डॉ. रेड्डीज लॅब्ज यांचे समभाग तेजीत राहिले. एशियन पेंट्स, इन्फोसिस, टायटन आणि कोटक बँक यांचे समभाग घसरणीत होते. सार्वजनिक बँकांच्या कंपन्यांमध्ये, तेल व वायू आणि रिऍल्टी समभागामध्ये खरेदी दिसल्याने बाजार काहीसा सावरताना दिसला. अमेरिकेसह इंग्लंड आणि भारत या देशांकडून नोव्हेंबर महिन्याचा महागाई दर याच आठवडय़ात सादर होणार आहे. त्याचा दबाव अनपेक्षितपणे बाजार दाखवत होता.
जागतिक कल नकारात्मक
जागतिक बाजारांचा कलदेखील सोमवारी निराशादायकच दिसला आहे. अमेरिकेतील डो जोन्स आणि नॅस्डॅक निर्देशांक घसरणीत राहिले होते. युरोपियन बाजारदेखील घसरणीतच राहिला होता. आशियाई बाजारात सेट कम्पोझिट, जकार्ता कम्पोझिट हे दोनच निर्देशांक तेजीत होते. तर निक्की, हँगसेंग, कोस्पी, शांघाय कम्पोझिट यांचे निर्देशांक घसरणीत होते.