न्यायालयाने 92 लाख रुपयांचा दंडही ठोठावला
वृत्तसंस्था/ पॅरिस
फ्रान्सचे माजी अध्यक्ष निकोलस सार्कोझी यांना पॅरिसच्या एका न्यायालयाने शुक्रवारी गुन्हेगारी कट रचल्याबद्दल 5 वर्षांचा तुरुंगवास ठोठावला. तसेच त्यांना 1,00,000 युरो (अंदाजे 92 लाख रुपयांचा) इतका दंड ठोठावतानाच आगामी पाच वर्षांसाठी कोणतेही सरकारी पद धारण करण्यास बंदी घातली. तथापि, न्यायालयाने सार्कोझींना भ्रष्टाचारासह इतर आरोपांमधून निर्दोष मुक्त केले. 2007 च्या राष्ट्रपती निवडणुकीत विजय मिळवण्यासाठी लिबियाचे तत्कालीन हुकूमशहा मुअम्मर गद्दाफी यांनी बेकायदेशीर निधी देण्याशी संबंधित हा खटला आहे.
70 वर्षीय सार्कोझी यांनी या निकालाला बेकायदेशीर असे संबांधत उच्च न्यायालयात अपील करण्याची घोषणा केली आहे. निकोलस सार्कोझी यांनी 2007 ते 2012 पर्यंत फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष म्हणून काम पाहिले. न्यायालयाने सार्कोझी यांना तात्काळ तुरुंगवासाऐवजी एका महिन्यानंतर ताब्यात घेण्याचे आदेश दिले. या प्रकरणात तीन माजी मंत्र्यांसह इतर अकरा जणांनाही आरोपी करण्यात आले. सार्कोझींच्या सरकारमध्ये गृहमंत्री असलेले क्लॉड गुएंट यांना सहा वर्षांची शिक्षा झाली परंतु त्यांच्या प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांना शिक्षा होणार नाही. माजी मंत्री ब्राइस हॉर्टेफ्यू यांना दोन वर्षांची शिक्षा झाली असून ते इलेक्ट्रॉनिक टॅग अंतर्गत घरीच शिक्षा भोगू शकतात.









