काश्मीरमध्ये धडक कारवाई : जरगर, बासित नंतर आता बशीरची संपत्ती जप्त
वृत्तसंस्था/ श्रीनगर
जम्मू-काश्मीरमध्ये राष्ट्रीय तपास यंत्रणा (एनआयए) दहशतवाद्यांच्या विरोधात आर्थिक सर्जिकल स्ट्राइक करत आहे. एनआयएने काश्मीरमध्ये दहशतवाद्यांची संपत्ती जप्त करण्याचे सत्र आरंभिले आहे. एनआयएने आता जम्मू-काश्मीरच्या कुपवाडा जिल्ह्यात हिजबुल मुजाहिदीनचा दहशतवादी बशीर अहमद पीरची संपत्ती जप्त केली आहे. तर एनआयएने यापूर्वी हिजबुल मुजाहिदीनचा दहशतवादी बासित रेशीची संपत्ती जप्त केली होती. त्यापूर्वी अल-उमर या दहशतवादी गटाचा संस्थापक मुश्ताक अहमद जरगरच्या संपत्तीला ताब्यात घेतले होते. एनआयएच्या या कारवाईमुळे दहशतवाद्यांमध्ये मोठा संदेश गेला आहे.

जम्मू-काश्मीरच्या कुपवाडा जिल्ह्यात हिजबुल मुजाहिदीनचा दहशतवादी बशीर अहमद पीरची संपत्ती जप्त करण्यात आली आहे. हा दहशतवादी काही दिवसांपूर्वी पाकिस्तानात मारला गेला होता. पाकिस्तानातून संचालित दहशतवाद्यांच्या विरोधात कारवाईच्या अंतर्गत एनआयएने उत्तम काश्मीरमधील क्रालपोराच्या बाबरपोरा भागाचा रहिवासी असलेल्या बशीरची संपत्ती जप्त केली. एनआयएने पीर उर्फ इम्तियाज आलमची जमीन ताब्यात घेतली आहे. नियंत्रण रेषेवरून जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांची घुसखोरी घडवून आणणाऱ्या पीरला मागील वर्षी चार ऑक्टोबर रोजी केंद्र सरकारकडून युएपीए अंतर्गत दहशतवादी घोषित करण्यात आले होते. पीरने हिजबुल मुजाहिदीन, लष्कर-ए-तोयबा आणि अन्य दहशतवादी संघटनांच्या कारवायांमध्ये वाढ करण्यासाठी पूर्वाश्रमीच्या दहशतवाद्यांना एकजूट करण्याच्या उद्देशाने ऑनलाइन कारवायांमध्ये भाग घेतला होता.
सोपोरमध्येही कारवाई
एनआयएने शुक्रवारी सोपोर शहरात हिजबुलचा दहशतवादी बासित रेशीची संपत्ती जप्त केली. गृह मंत्रालयाने अलिकडेच बासितला युएपीए अंतर्गत दहशतवादी घोषित केले होते. सोपोर शहरातील डांगरपोरा भागात त्याची संपत्ती होती.
कुख्यात दहशतवाद्याची संपत्ती जप्त
एनआयएने गुऊवारी श्रीनगर शहरात दहशतवादी गट अल-उमर मुजाहिदीनचा संस्थापक मुश्ताक अहमद जरगरची संपत्ती जप्त केली होती. केंद्रीय गृह मंत्रालयाने युएपीए अंतर्गत जरगरला दहशतवादी घोषित केले होते, यानंतरच स्थानिक पोलीस आणि सीआरपीएफच्या मदतीने एनआयएच्या अधिकाऱ्यांनी श्रीनगर शहरातील नौहट्टा भागात असलेले जरगरचे घर सील केले आहे. जरगरला 15 मे 1992 रोजी अटक करण्यात आली होती. परंतु कंधार विमान अपहरणानंतर जरगरची जैश-ए-मोहम्मद प्रमुख मसुद अझहर तसेच शेख अमरसोबत सुटका करण्यात आली होती.









