चंदीगढ / वृत्तसंस्था
पंजाबमधील 57 गुंडटोळय़ांची तसेच अनेक गँगस्टरांची माहिती एनआयएने पंजाब सरकारकडे मागितली आहे. यामध्ये सीख फॉर जस्टीस या दहशतवादी गटाशी संबंधित समाजकंटकांचाही समावेश आहे. पंजाब सरकारला आता कायद्याप्रमाणे ही माहिती द्यावी लागणार असून या माहितीच्या तपासणीनंतर हे गँगस्टर आणि त्यांच्या टोळय़ा यांची मालमत्ता जप्त करण्यात येणार आहेत.
पंजाबमधील अंमली पदार्थ माफिया, गुंड आणि दहशतवादी यांच्यातील संबंध आणि संपर्क तोडण्याचा प्रयत्न एनआयए सातत्याने करीत आहे. या प्रयत्नांचा एक भाग म्हणून एनआयएने दोन एफआयआर सादर केले आहेत. विदेशात राहून भारतविरोधीं कारवाया करणारा गँगस्टर लखबीर लंडा, जग्गू भगवानपुरिया, लॉरेन्स बिष्णोई, काला जठेरा, भुप्पी आदी गँगस्टरांच्याही मागावर एनआयए आहे. पंबाज, उत्तर प्रदेश, हरियाणा आणि राजस्थान या राज्यांमध्ये हा तपास सुरु आहे.
उत्तर प्रदेशात धडक कारवाई दहशतवाद्यांशी संबंध असणाऱया अनेक गँगस्टरांवर उत्तर प्रदेश सरकारने धडक कारवाई केली आहे. अनेक समाजकंटकांच्या मालमत्ता जप्त करण्यात आल्या आहेत, किंवा स्थावर आस्थापने तोडण्यात आली आहेत. मोठय़ा गँगस्टरांची माहिती प्रत्येक जिल्हय़ाच्या आयुक्तांकडून मागविण्यात आली आहे. जी नावे एनआयएने कळविली आहेत, त्या व्यक्तींवर बारकाईने लक्ष ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. संशयास्पद हालचाली करणाऱया व्यक्तींना तत्काळ ताब्यात घेऊन त्यांची सखोल चौकशी केली जात आहे, अशी माहिती देण्यात आली.









