मध्यप्रदेश-राजस्थानमध्ये कारवाई, दहशतवादी कारस्थान उघड
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
एनआयए म्हणजेच राष्ट्रीय तपास संस्थेने शनिवारी मध्यप्रदेश आणि राजस्थानमधील काही ठिकाणी छापे टाकले आहेत. बंदी घातलेली संघटना ‘हिज्ब उत-तहरीर’शी (एचयूटी) संबंधित एका प्रकरणात हे छापे टाकण्यात आले. ‘हिज्ब उत-तहरीर’ ही संघटना मुस्लीम तरुणांना भडकावत असून त्यांना चुकीच्या मार्गावर नेत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर ही कारवाई करण्यात आल्याचे समजते. भोपाळमध्ये तीन ठिकाणी आणि राजस्थानमधील झालावाडमध्ये दोन ठिकाणी छापे टाकण्यात आले. ही कारवाई ‘हिज्ब उत-तहरीर’ आणि त्याच्या सदस्यांच्या कारवायांच्या तपासाचा एक भाग आहे. एनआयए या प्रकरणाची सखोल चौकशी करत आहे.
एनआयएने ‘हिज्ब उत-तहरीर’ संघनटेवर केलेली छाप्यांची कारवाई ही देशातील दहशतवाद आणि कट्टरपंथी विचारसरणी पसरवणाऱ्या संघटनांना संपवण्याच्या प्रयत्नाचा एक भाग आहे. तपास संस्थेनुसार ‘हिज्ब उत-तहरीर’ अजूनही सक्रीय असून दहशतवादी कट रचत असल्याचे निदर्शनास आले आहे. मुस्लीम तरुणांना आपल्या संघटनेत भरती करून त्यांना हिंसाचार पसरवण्यासाठी प्रवृत्त केले जात आहे. त्यांचे उद्दिष्ट भारतातील लोकशाही सरकार उलथवून शरिया कायद्यावर आधारित इस्लामिक स्टेटचे (आयएस) प्रस्थ वाढवणे हे असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
डिजिटल उपकरणे जप्त
एनआयएच्या पथकांनी शोधमोहिमेदरम्यान काही डिजिटल उपकरणे जप्त केली आहेत. ही उपकरणे चौकशीसाठी पाठवली जाणार आहेत. या प्रकरणाच्या तळाशी जाऊन दोषींना शिक्षा करण्याचे एनआयए अधिकाऱ्यांचे नियोजन आहे. एनआयए देशात शांतता आणि सुरक्षा राखण्यासाठी काम करत आहे. कोणत्याही प्रकारचे दहशतवादी कट उधळून लावण्यासाठी एनआयए तपास यंत्रणा मोलाचे कार्य बजावत आहे.
‘हिज्ब उत-तहरीर’ दहशतवादी संघटना घोषित
भारत सरकारने गेल्यावर्षी ‘हिज्ब उत-तहरीर’ला (एचयूटी) दहशतवादी संघटना म्हणून घोषित केली होती. ही संघटना अनेक दहशतवादी कारवायांमध्ये सहभागी आहे. गृह मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, ‘हिज्ब उत-तहरीर’ निष्पाप तरुणांना आमिष दाखवून त्यांना दहशतवादी संघटनांमध्ये भरती करते. या संघटना दहशतवादी कारवायांसाठी पैसे देखील गोळा करतात. अशा संघटनांपासून देशाच्या राष्ट्रीय सुरक्षा आणि सार्वभौमत्वासाठी गंभीर धोका असल्यामुळे त्यांची कट-कारस्थाने रोखण्यासाठी तपास यंत्रणा सक्रीय झाल्या आहेत.









