9 जिल्ह्यांमधील 21 ठिकाणी घेतली झडती
वृत्तसंस्था/ चेन्नई
एनआयएने रविवारी तामिळनाडूत 21 ठिकाणी छापे टाकून चौकशी हाती घेतली आहे. एनआयएच्या अधिकाऱ्यांनी रविवारी तंजावुर जिल्ह्यातील तिरुभुवनम येथे पट्टाली मक्कल काचीच्या (पीएमके) नेत्याची 2019 मध्ये झालेल्या हत्येप्रकरणी तामिळनाडूत हे छापे टाकले आहेत. तिरुनेलवेली जिल्ह्यात सोशल डेमोक्रेटिक पार्टी ऑफ इंडियाचे नेते मुबारक यांच्या निवासस्थानीही छापा टाकण्यात आला आहे.
पीएमके नेते रामलिंगम यांनी तिरुभुवनम येथील कथित धर्मांतराच्या प्रयत्नांवर प्रश्न उपस्थित केल होते. यानंतर रामलिंगम यांची एका समुहाने हत्या केली होती. एनआयएने या हत्येप्रकरणी काही जणांना यापूर्वीच अटक केली आहे. तर काही संशयित फरार असल्याचे सांगण्यात आले.
मदुराई, तंजावुर, तिरुनेलवेली, मयिलादुथुरई या जिल्ह्यांसमवेत अन्य काही ठिकाणी एनआयएने छापे टाकले आहेत. पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियावर बंदी घालण्यात आल्यावर एनआयएने तामिळनाडूत अनेक ठिकाणी छापे टाकले ओत. राज्य तसेच केंद्रीय यंत्रणांनी राज्यात अनेक सामाजिक संघटनांच्या बॅनर अंतर्गत प्रतिबंधित पीएफआय पुन्हा डोकं वर काढत असल्याचे समोर आल्यावर अलर्ट जारी केला आहे.









