भटिंडी, शोपियान, राजौरीमध्ये कारवाई
वृत्तसंस्था/ श्रीनगर
राष्ट्रीय तपास यंत्रणा (एनआयए) जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांचा पर्दाफाश करण्यासाठी सातत्याने छापे टाकत आहे. चालू महिन्यात आतापर्यंत तीनवेळा कारवाई करण्यात आली असून शुक्रवारी सकाळी तपास यंत्रणेने काश्मीर खोऱ्यात वेगवेगळ्या ठिकाणी छापे टाकले आहेत. भटिंडी परिसरात एनआयए पथकाकडून दिवसभर शोधमोहीम सुरू होती. टेरर फंडिंग आणि ओजीडब्ल्यू नेटवर्कशी संबंधित लोकांवर एनआयएच्या पथकाने छापे टाकल्याची माहिती सूत्रांनी दिली.
दहशतवाद्यांचे जाळे नष्ट करण्याची मोहीम सुरू ठेवत राष्ट्रीय तपास संस्थेने शुक्रवारी जम्मू-काश्मीरमधील सहा जिल्ह्यांमध्ये आठ ठिकाणी शोधमोहीम राबवली. यादरम्यान एका तऊणाला चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे, मात्र याला अधिकृत दुजोरा मिळालेला नाही. झडतीदरम्यान एनआयए पथकाने संबंधित लोकांचे मोबाईल फोन, सिमकार्ड आणि आर्थिक व्यवहारांशी संबंधित काही कागदपत्रे आणि इतर डिजिटल उपकरणेही जप्त केली आहेत. एनएआयएच्या पथकाने राजौरीमध्येही शोध घेतला आहे.
पहाटे पाच वाजल्यापासून मोहीम
जम्मू-काश्मीरमध्ये इंटरनेट माध्यमांद्वारे दहशतवादी आणि फुटीरतावादी कारवायांना प्रोत्साहन देणे, नवीन दहशतवाद्यांची भरती करणे, दहशतवाद्यांना शस्त्रे आणि पैशांचा पुरवठा करणे आणि नवीन संघटना तयार करणे या प्रकरणी ही कारवाई करण्यात आल्याचे संबंधित अधिकाऱ्यांनी सांगितले. शुक्रवारी पहाटे 5 वाजण्याच्या सुमारास शोधमोहीम सुरू झाली होती. कुलगाम जिल्ह्यातील परिवान, कुपवाडा जिह्यातील करालपोरा आणि शोपियान जिल्ह्यातील छोटीगाम येथे घरांची झडती घेण्यात आली. तसेच जम्मू जिह्यातील हिवाळी राजधानीच्या सीमेवर असलेल्या बठिंडी येथील परवेझ मीरच्या घराची झडती घेण्यात आली. परवेझ मीर हा मूळचा दोडा जिल्ह्यातील रहिवासी असून गेल्या काही वर्षांपासून तो भटिंडी येथे राहत होता. झडतीदरम्यान एनआयएच्या पथकाने त्याचा भाचा ओसामा तारिकचा फोनही जप्त केला आहे. भटिंडीमध्ये एनआयएच्या पथकाने मोहम्मद रियाझ नावाच्या तऊणाला चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. तो राजौरी जिह्यातील उदानवादन येथील रहिवासी आहे.









