19 ठिकाणी कारवाई : महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, बिहारमध्येही संशयितांची झाडाझडती,विदेशी निधीच्या संशयावरून मुफ्ती खालिदची चौकशी,झाशीमध्ये चौकशीअंती एक मदरसा शिक्षक ताब्यात
वृत्तसंस्था/नवी दिल्ली, झाशी
राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) चार राज्ये आणि केंद्रशासित प्रदेश जम्मू-काश्मीरमधील 19 ठिकाणी गुरुवारी छापे टाकले. जम्मू-काश्मीरमधील दहशतवादाशी संबंधित एका प्रकरणात एनआयए अधिकाऱ्यांकडून रियासी, बडगाम, अनंतनागसह अनेक ठिकाणी झडती सुरू होती. तसेच बिहारमधील सीतामढी, उत्तर प्रदेशातील झाशी, छत्तीसगड, ओडिशा आणि महाराष्ट्रातील दहशतवादी कारवायांशी संबंधित लोकांच्या आश्रयस्थानांवर आणि नक्षल नेटवर्कवर छापे टाकण्यात आले. एनआयएने दहशतवाद, संघटित गुन्हेगारी आणि नक्षलवादाच्या विरोधात ही कारवाई केली आहे.
बिहारमधील सीतामढी जिल्ह्यातील बाजपट्टी पोलीस स्टेशन परिसरात गुरुवारी पहाटे एका चिकन विक्रेत्याच्या घरावर राष्ट्रीय तपास यंत्रणेने छापा टाकला. एनआयएच्या पथकाने सुमारे तीन तास घराची झडती घेतली आणि तरुणाला ताब्यात घेतले. मात्र, एनआयएने या छाप्याबाबत कोणतेही अधिकृत वक्तव्य दिलेले नाही. ही कारवाई संशयित दहशतवादी आणि गुन्हेगारांच्या नेटवर्कशी जोडलेली आहे. एनआयएच्या अधिकाऱ्यांनी तरुणाचा मोबाईल जप्त केला असून त्याची फॉरेन्स तपासणी केली जाणार आहे. या छाप्यानंतर परिसरात विविध प्रकारची चर्चा सुरू झाली आहे.
झाशीत ‘एनआयए’विरोधात निदर्शने
एनआयएने उत्तर प्रदेशातील झाशी जिल्ह्यातही मोठी कारवाई केली. एनआयए आणि उत्तर प्रदेश एटीएसच्या पथकाने मुफ्ती खालिद नदवी यांच्या घरावर छापा टाकला. या छाप्यात एनआयएच्या पथकाने मुफ्ती यांना ताब्यात घेतल्यानंतर त्यांचे समर्थक संतापले. कारवाईदरम्यान घटनास्थळी 200 हून अधिक लोक जमा झाल्यानंतर त्यांनी आंदोलन सुरू केले. गोंधळानंतरही पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणली आणि मुफ्ती खालिद यांना एसएसपी कार्यालयात नेले. एनआयएने या छाप्यात विदेशी निधीशी संबंधित महत्त्वाची कागदपत्रे जप्त केली आहेत.
जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादाविरोधात झडती
जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादाशी संबंधित एका मोठ्या प्रकरणात एनआयएने छापे टाकले. एनआयएच्या पथकाने जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेच्या नेटवर्कचा पर्दाफाश करण्यासाठी रियासी, बडगाम आणि अनंतनागसारख्या भागात ही कारवाई केली. या छाप्यामागे दहशतवादी गटांची भरती प्रक्रिया आणि त्यांचे आर्थिक नेटवर्किंग शोधणे हा उद्देश होता असे एनआयएच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादी कारवाया उधळून लावण्यासाठी आणि भारताविरोधातील कटाचा पर्दाफाश करण्यासाठी ही कारवाई करण्यात आली.
छत्तीसगड, ओडिशातही कारवाई
एनआयएने छत्तीसगडमधील सुकमा आणि मलकानगिरी तसेच ओडिशात नक्षल प्रकरणांशी संबंधित लोकांच्या घरांवर छापे टाकले. सुकमा येथे यापूर्वी नक्षल-संबंधित प्रकरणांमध्ये अटक करण्यात आलेल्या दोन संशयितांच्या घरांवर कारवाई करण्यात आली. या दोघांनाही एनआयएच्या पथकाने नक्षलवादी नेटवर्कशी संबंधित प्रकरणांमध्ये चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. ओडिशातील मलकानगिरी आणि कोंटा भागातही एनआयएचे पथक सतत तपास करत असल्यामुळे परिसरात तणाव वाढला आहे.
महाराष्ट्रात दोन ठिकाणी छापे
महाराष्ट्रातील अमरावती आणि भिवंडी सारख्या भागात एनआयए आणि महाराष्ट्र एटीएसच्या संयुक्त पथकाने दहशतवाद्यांशी संबंध असलेल्या संशयितांवर छापे टाकले. पथकाने तिघांना ताब्यात घेऊन चौकशी केली. सदर संशयित दीर्घकाळापासून देशविरोधी कारवायांमध्ये गुंतल्यामुळे त्यांच्यावर नजर ठेवण्यात येत होती. हे पथक आता या संशयितांकडून दहशतवादी संघटनांशी असलेले घनिष्ट संबंध तपासत आहेत.









