आयएसआयएस थ्रिसूर मॉड्यूलच्या फरार मास्टरमाईंडला अटक
वृत्तसंस्था/ चेन्नई
राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) बुधवारी चेन्नईत टाकलेल्या छाप्यात आयएसआयएस थ्रिसूर मॉड्यूलच्या फरार मास्टरमाईंडला अटक केली. देशातून पळून जाण्याचा प्रयत्न करण्यापूर्वीच एनआयएने त्याला पकडले. अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव सय्यद नबील अहमद असून तो थ्रिसूरचा रहिवासी आहे.
एनआयएचे पथक गेल्या काही आठवड्यांपासून अहमदच्या मागावर होते. आरोपी गेल्या अनेक आठवड्यांपासून कर्नाटक आणि तामिळनाडूमध्ये विविध ठिकाणी लपून बसला होता. बनावट नाव आणि बनावट कागदपत्रे वापरून नेपाळमार्गे परदेशात पळून जाण्याचा त्याचा कट होता. अटक करण्यात आलेल्या सय्यद नबील अहमद याच्या ताब्यातून गुन्ह्याची कागदपत्रे आणि डिजिटल उपकरणे जप्त करण्यात आली आहेत. जुलै महिन्यापासून या प्रकरणात अटक झालेला हा तिसरा आरोपी आहे.
यावषी जुलैमध्ये एनआयएने तामिळनाडूतील सत्यमंगलमजवळील आशिफ उर्फ मथिलकथ कोडायल अश्र्रफला अटक केली होती. 11 जुलै 2023 रोजी नोंदवलेल्या प्रकरणात तपास सुरू असून अनेकजण रडारवर आहेत. हे मॉड्यूल ‘आयएस’च्या कारवायांना प्रोत्साहन देण्यात आणि दहशतवादी हल्ले करण्यासाठी निधी उभारण्यात गुंतले होते. ते दहशतवादी कारवाया करण्याची योजना आखत होते आणि त्यांनी याआधीच राज्यातील नेत्यांसह काही धार्मिक स्थळे आणि इतर प्रमुख ठिकाणांची रेकी केली होती. केरळमध्ये दहशत पसरवणे आणि जातीय तेढ निर्माण करणे हा त्यांचा उद्देश होता.
आयएसआयएस (इस्लामिक स्टेट ऑफ इराक अँड सीरिया) हा एक आंतरराष्ट्रीय दहशतवादी इस्लामिक दहशतवादी गट असून त्याला इस्लामिक स्टेट असेही संबोधले जाते. या दहशतवादी संघटनेने विविध राज्यांमध्ये मॉड्यूल्स तयार करून आणि जिहादी तत्त्वज्ञानाचे पालन करून प्रेरित तऊणांची सक्रियपणे भरती करून भारतातील आपल्या कारवाया तीव्र केल्या आहेत.









