बीएचयूमधील काही विद्यार्थ्यांना घेतले ताब्यात
वृत्तसंस्था/ वाराणसी
उत्तरप्रदेशच्या 5 जिल्ह्यांमध्ये एनआयएने मंगळवारी छापे टाकले आहेत. आझमगड, देवरिया, वाराणसी, प्रयागराज आणि चंदौली येथील 8 ठिकाणी शोधमोहीम हाती घेण्यात आली. वाराणसी येथील बीएचयूच्या दोन विद्यार्थ्यांना एनआयएने ताब्यात घेतले आहे. नक्षलवादी कारवायांप्रकरणी एनआयएने ही कारवाई केली असल्याचे समजते.
बीएचयूमधील एका विद्यार्थी संघटनेचा नक्षली कारवायांमध्ये सहभाग असल्याचे इनपूट मिळाले होते. विद्यार्थी संघटनेशी संबंधित कागदपत्रे एनआयएने ताब्यात घेतली असून बीसीएमच्या अध्यक्ष आकांक्षा आझाद अन् सहसचिव सिद्धी यांना ताब्यात घेत त्यांचे लॅपटॉप जप्त करण्यात आले आहेत. तर आझमगडमध्येही नक्षलवादी संघटनांशी संबंधित लोकांविरोधात कारवाई करण्यात येत आहे.
प्रयागराजमध्ये कथित मानवाधिकार कार्यकर्त्या सीमा आझाद अन् त्यांचे पत्नी विश्वविजय यांच्या घरी छापे टाकण्यात आले. या कारवाईदरम्यान एनआयएने काही जणांना ताब्यात घेतल्याचे मानले जाते, परंतु याची अधिकृत पुष्टी होऊ शकलेली नाही. सीमा आझाद अन् त्यांच्या पतीचा लॅपटॉप, मोबाइल एनआयएने जप्त केले आहेत.









