दोघांना बजावल्या नोटिसा, इलेक्ट्रॉनिक उपकरणे जप्त
► वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
एनआयएच्या पथकांनी शनिवारी (11 मार्च) मध्यप्रदेशातील सिवनी येथे चार ठिकाणी छापेमारी केली. एनआयएच्या दिल्ली मुख्यालयात दाखल झालेल्या गुन्ह्याच्या तपासादरम्यान सिवनी जिह्यात संशयास्पद आणि बेकायदेशीर हालचालींची माहिती मिळाल्यावर एनआयएचे पथक तपासासाठी सिवनी भागात पोहोचले होते. त्यानंतर दोन दिवस येथे तपासकाम हाती घेण्यात आले होते. तपासादरम्यान एनआयएच्या अधिकाऱ्यांनी इस्लामिक स्टेट-खोरासान प्रांत प्रकरणातील संशयित तलहा खान आणि अक्रम खान यांच्या घरांची झडती घेतली. त्यानंतर दोघांना नोटिसा बजावण्यात आल्या असून इलेक्ट्रॉनिक उपकरणे जप्त केल्याचे सांगण्यात आले.
एनआयएचे पथक बेकायदेशीर क्रियाकलाप (प्रतिबंध) कायद्याच्या (यूएपीए) कलमांव्यतिरिक्त भारतीय दंड संहितेच्या कलम 121, 121 ए अंतर्गत दिल्लीत दाखल झालेल्या प्रकरणाची चौकशी करत आहे. एनआयएने पुणे, शिमोगा आदी ठिकाणीही तपासकार्य हाती घेतल्याचे सांगितले जात आहे. मात्र, या तपासाबाबत पूर्णपणे गोपनीयता पाळली जात आहे. ज्या ठिकाणांची झडती घेण्यात आली त्यात संशयित अब्दुल अजीज सल्फी आणि शोएब खान यांच्या निवासी आणि व्यावसायिक जागेचा समावेश आहे. अटकेतील संशयित दहशतवाद्यांच्या जबानीतून प्राप्त झालेल्या माहितीच्या आधारे गेल्या दोन दिवसांपासून एनआयएकडून कसून तपास आणि शोधमोहीम हाती घेण्यात आली आहे. मध्यप्रदेशसोबतच कर्नाटक आणि महाराष्ट्रातील धागेदोरे शोधण्याचा प्रयत्न तपास यंत्रणांकडून केला जात आहे.









