वृत्तसंस्था/ भोपाळ
मध्यप्रदेशची राजधानी भोपाळमध्ये रविवारी राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) मोठी कारवाई केली. एनआयएच्या पथकाने रविवारी सकाळी शहरात अनेक ठिकाणी छापे टाकले. सायंकाळपर्यंत ही कारवाई सुरूच होती. दिल्लीमध्ये दाखल झालेल्या एका तक्रारीनुसार एनआयएच्या पथकाने अनेकांना ताब्यात घेत त्यांची चौकशी सुरू केली होती.
एनआयएने रविवारी पहाटे 4 वाजता शहरातील 10 ठिकाणी छापे टाकले आहेत. अशोका गार्डन, ऐशबाग, जहांगीराबाद येथे कारवाई सुरु करण्यात आली. येथून एनआयएने डझनहून अधिक लोकांना ताब्यात घेतले आहे. दिल्लीतील काही जुन्या प्रकरणावर एनआयए कारवाई करत आहे. एनआयएची रायपूर आणि दिल्लीची टीम या कारवाईत सहभागी होती. या धाडसत्राबाबत एनआयएने स्थानिक तपास यंत्रणांना कोणतीही माहिती दिली नव्हती. तसेच एनआयएने प्रसारमाध्यमांशीही याबाबत कोणतीही अधिकृत माहिती शेअर केलेली नाही.









