एनआयएचे 5 सदस्यीय पथक ब्रिटनमये दाखल : अवतार खांडा अन् खलिस्तान समर्थकांवर नजर
वृत्तसंस्था/ लंडन
खलिस्तान समर्थक अमृतपाल सिंहच्या विरोधात भारतात कारवाई झाल्यावर ब्रिटनमधील भारतीय दूतावास भवनावर झालेल्या हल्ल्याच्या चौकशीसाठी एनआयएचे पथक लंडनमध्ये पोहोचले आहे. एनआयएचे 5 सदस्यीय पथक तिरंग्याच्या अपमानाची चौकशी करणार आहे. अमृतपाल सिंहचा हँडलर अवतार सिंह खांडा, गुरचरण सिंह आणि जसवीर सिंह हे मुख्य संशयित आहेत.
19 मार्च 2023 रोजी लंडनमधील भारतीय दूतावासावर झालेल्या हल्ल्याप्रकरणी एक एफआयआर दिल्ली पोलिसांकडून नोंद करण्यात आली होती. परंतु 23 मार्च रोजी हे प्रकरण एनआयएकडे वर्ग करण्यात आले. एनआयएचे पथक याच्या चौकशीनिमित्त भारतीय दूतावासात पोहोचले आहे. 19 मार्च रोजी घडलेल्या घटनेचा तपशील, सीसीटीव्ही फुटेज इत्यादी गोष्टी प्राप्त करत तपास केला जाणार आहे. याचबरोबर गुन्ह्याच्या स्थळाला भेट दिली जाणार आहे. दूतावासाच्या कर्मचाऱ्यांचाही जबाव नोंदवून घेतला जाणार आहे.
अमृतपाल सिंहच्या अटकेनंतर घडलेल्या घटनांचा एनआयए तपास करत आहे. पंजाबला अस्थिर करत देशात अशांतता निर्माण करण्यासाठी विदेशी भूमीवरून सक्रीय खलिस्तान समर्थकांकडून कट रचला जात आहे.
अवतार खांडावर गुन्हा नोंद
दिल्ली पोलिसांच्या एफआयआरमध्ये अवतार सिंह खांडा, गुरचरण सिंह आणि जसवीर सिंहला प्रमुख संशयित ठरविण्यात आले आहे. केंद्रीय गृह मंत्रालयाने याप्रकरणाचा तपास एनआयएला सोपविला आहे. अमृतपालचा हँडलर खांडाच असल्याचे एनआयए तसेच विविध यंत्रणांकडून करण्यात आलेल्या चौकशीतून समोर आले आहे. विविध देशांमध्ये सक्रीय खलिस्तान समर्थक संघटनांसोबत त्याचे संबंध आहेत. खांडा कथित स्वरुपात ब्रिटनकडून आश्रय मागणार आहे. अनेक वर्षांपासून खांडाने खलिस्तानी दहशतवादी जगतार सिंह तारा आणि बब्बर खालसा इंटरनॅशनलचा सदस्य परमजीत सिंह पम्मासोबत संबंध बाळगून आहे. मानवाधिकारांच्या उल्लंघनाचा कांगावा करत खांडा हा शीख युवकांना कट्टरवादात लोटत आहे.
ब्रिटनमधील घटना
ब्रिटनमधील घटना ही अमृतपाल सिंहच्या समर्थनार्थ खलिस्तानवाद्याचे नेटवर्क सक्रीय होण्याचा परिणाम आहे. याचमुळे अमृतपालला राष्ट्रीय सुरक्षा कायद्याच्या अंतर्गत ताब्यात घेण्यात आले आहे. अमृतपालची सध्या चौकशी सुरू आहे. ब्dिराटनमध्ये कट्टरवाद्यांकडून करण्यात आलेली हिंसा ही भारतात अमृतपालसारख्या खलिस्तान समर्थकांवर करण्यात आलेल्या कारणामुळे झाली आहे. पाकिस्तानची गुप्तचर यंत्रणा आयएसआयच्या पाठबळावर खलिस्तानी दहशतवादी संघटना सक्रीय झाल्या आहेत.
अमृतपालच्या अडचणी वाढणार एनआयएच्या चौकशीला यश येऊ लागल्याने आगामी काळात अमृतपाल सिंहच्या अडचणी वाढणार आहेत. अमृतपाल सिंह अन् खांडामधील कनेक्शन स्पष्ट झाल्यावर त्याच्या विरोधात एनएसए अंतर्गत नोंद गुन्हा हा युएपीएच्या अंतर्गत बदलला जाऊ शकतो.









