गुप्तचर अन् सायबर सुरक्षा यंत्रणांसोबत मिळून नवी योजना
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
सोशलमीडिया प्लॅटफॉर्मवर देशविरोधी सामग्री अपलोड करणाऱ्यांच्या विरोधात कठोर कारवाईची तयारी एनआयए करत आहे. एनआयए गुप्तचर अन् सायबर सुरक्षा यंत्रणांसोबत मिळून देशविरोधी कंटेंट अपलोड करणाऱ्यांच्या विरोधात एक मजबूत व्यवस्था निर्माण करत आहे.
दहशतवादी संघटना कट्टरवाद फैलावण्यासाठी ऑनलाइन प्लॅटफॉर्मचा वापर करत असल्याने तपास यंत्रणा आता कारवाईची तयारी करत आहेत. अलिकडेच खलिस्तानी दहशतवादी गुरपतवंत सिंह पन्नू, गँगस्टर गोल्डी बरार आणि अन्य भारतविरोधी गुन्हेगारांचे ऑनलाइन व्हिडिओ भारत सरकारकडून ब्लॉक करण्यात आले आहेत. तर यंत्रणा सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना नव्या फ्रेमवर्कच्या अंतर्गत त्यांच्या जबाबदाऱ्यांविषयी औपचारिक स्वरुपात कळविणार आहेत.
नव्या संयुक्त योजनेच्या अंतर्गत सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना स्वत:च्या प्रणालीच्या माध्यमातून देशविरोधी आणि भ्रामक कंटेंटवर नजर ठेवावी अन् ती हटवावी लागणार आहे. याचबरोबर सरकारला नियमित स्वरुपात पोस्टवर करण्यात आलेल्या कारवाईविषयी अपडेट द्यावी लागणार आहे. यात विदेशातून अपलोड करण्यात आलेली सामग्रीही सामील आहे.
भारताबाहेरून अशाप्रकारची सामग्री पोस्ट करणाऱ्यांच्या विरोधात भारतीय कायद्याच्या अंतर्गत कारवाई करण्यात येईल. तसेच देशात या सामग्रीला पोस्ट करणाऱ्या व्यक्ती आणि नेटवर्कच्या विरोधातही कारवाई केली जाणार आहे.









