पुणे / प्रतिनिधी :
धार्मिक प्रचाराच्या नावाखाली देश विघातक कृत्य करून सामान्य माणसांची दिशाभूल करणाऱ्या पुण्यातील एका इसिसशी संबंधित संशयित तरुणास कोंढवा परिसरातील नुरानी मस्जिदजवळून एनआयएने चौकशीसाठी ताब्यात घेतले.
हा तरुण इसिस या संघटनेशी संबंधित असल्याचा संशय तपास यंत्रणेला असून अनेक दिवसांपासून त्याच्या हालचालींवर लक्ष होते. राष्ट्रीय तपास यंत्रणा (एनआयए) व इंटेलिजन्स ब्युरो (आयबी) यांनी एकत्रपणे सोमवारी राज्यातील विविध ठिकाणी छापेमारी करत काही जणांना ताब्यात घेतले. त्यातीलच एक भाग म्हणून पुण्यातील कोंढवा परिसरात असलेल्या नुरानीजवळ एक तरुण धार्मिक प्रचाराच्या नावाखाली दहशतवादी कृत्यांना प्रोत्साहन देत असल्याचे तपास यंत्रणा कळाले. आधीपासूनच तपास यंत्रणेच्या रडारवर असलेला जुबेर नामक तरुण अखेर अधिकाऱ्यांच्या जाळ्यात अडकला.
काही दिवसांपूर्वी मुंबईतील नागपाडा येथील तरुणास दहशतवादी कारवायाच्या संशयांवरून ताब्यात घेण्यात आले होते. मिळालेल्या माहितीनुसार एनआयएने संयुक्तपणे कारवाई करत मुंबईत काही ठिकाणी, तर अन्य एका पथकाने पुण्यातील कोंढवा परिसरात सोमवारी (दि. ३) सकाळी छापेमारी केली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या संयुक्त कारवाईत कोंढवा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका सोसायटीमध्ये एनआयए-आयबी यांच्या पथकाने सकाळीच छापे मारले. तपास यंत्रणेला जो तरुण हवा होता, तो एका मशीदजवळ आढळला.









