प्रतिनिधी /बेळगाव
गोंधळी गल्ली येथील एनएफसीआय हॉटेल मॅनेजमेंट इन्स्टिटय़ूटतर्फे इंडियाज बुक ऑफ रेकॉर्डमध्ये विक्रम नोंदविण्यात आला आहे. राजगिरा व वरीचे तांदूळ यांच्यापासून प्रत्येकी 15 प्रकारचे पदार्थ तयार करून त्यांनी हा विक्रम केला आहे. केवळ बेळगावच नाही तर देशभरातील 16 शाखांमधील विद्यार्थ्यांनी 725 हून अधिक पदार्थ तयार करून ते प्रदर्शनात मांडल्याने विक्रम प्रस्थापित होऊ शकला.
राजगिरा व वरीच्या तांदळांपासून इडली व डोसे तयार करण्यात आले. स्टफ इडली, इडली 65, इडली मंचुरियन, शेजवान इडली याचबरोबर डोशाचे विविध प्रकार विद्यार्थ्यांनी तयार केले. देशभरातील 735 पदार्थ एकाचवेळी ऑनलाईन नोंद घेऊन हा विक्रम प्रस्थापित करण्यात आला. इन्स्टिटय़ूटच्या प्रमुख रोमा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली बेळगाव येथील विद्यार्थ्यांनी हे पदार्थ तयार केले होते.
यावेळी शेफ निरंजन गद्रे, शेफ महांतेश तोरगल, वृशाली, भाग्यश्री यांसह बेळगाव विभागाचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते. बेळगावसोबतच पंजाब, हरियाणा, उत्तरप्रदेश, हिमाचल प्रदेश, कर्नाटक, चंदिगड या सर्व शाखांमध्ये एकत्रित विक्रम करण्यात आला. याची नोंद घेत इंडिया बुक ऑफ रिकॉर्डमध्ये विक्रमाची नोंद झाली आहे.









