सौदी अरेबियाच्या अल हिलाल क्लबमध्ये सामील : दोन वर्षासाठी करारबद्ध : नेमारने ठेवले रोनाल्डोच्या पावलावर पाऊल
वृत्तसंस्था/ पॅरिस
सौदी अरेबियाचा फुटबॉल क्लब अल-हिलालमध्ये ब्राझीलचा दिग्गज खेळाडू नेमार सहभागी झाला आहे. 15 ऑगस्ट रोजी नेमारने यासंदर्भातील अधिकृत घोषणा केली आहे. 2017 मध्ये, नेमारला पॅरिस सेंट जर्मन (पीएसजी) क्लबमध्ये सहभागी झाला होता. त्यावेळी नेमारने पॅरिस सेंट जर्मनसोबत 222 दशलक्ष युरोंचा करार केला होता. आता 800 कोटींहून अधिक रकमेच्या करारासह अल-हिलालने नेमारला दोन वर्षांसाठी आपल्या क्लबमध्ये समाविष्ट केले आहे. विशेष म्हणजे, सौदी प्रो-लीगमध्ये नेमार आता पोर्तुगालचा स्टार खेळाडू ख्रिस्तियानो रोनाल्डोविरुद्ध खेळताना दिसणार आहे.
नेमार मागील 6 वर्षांपासून पॅरिस सेंट जर्मनचा भाग आहे. विशेष म्हणजे, 2025 सालापर्यंत अल-हिलालमध्ये नेमारची किंमत सुमारे 400 दशलक्ष डॉलर्सपर्यंत पोहोचण्याचा अंदाज आहे. नेमार आमच्याशी करारबद्ध झाला असून पुढील दोन वर्षाच्या कालावधीत त्याच्या रकमेत वाढ होणार असल्याचे अल हिलाल क्लबच्या व्यवस्थापनाकडून सांगण्यात आले आहे. दरम्यान, पीएसजी क्लबचे अध्यक्ष नासेर अल खेलाफी म्हणाले की, क्लबमधील नेमारचा पहिला दिवस ते आयुष्यात कधीही विसरणार नाहीत. यावेळी पीएसजी संघ व व्यवस्थापनाकडून नेमारला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.
अल निसार क्लबशी रोनाल्डोचा अडीच वर्षासाठी विक्रमी करार
गतवर्षी पोर्तुगालच्या ख्रिस्तियानो रोनाल्डोने अल नासरसोबत 2025 पर्यंत करार केला आहे. हा करार अडीच वर्षांसाठी आहे. रोनाल्डोने या क्लबसोबत 3 वर्षांसाठी 200 मिलियन युरोंहून अधिकचा (1750 कोटी रु.) करार केला आहे. म्हणजेच वर्षाला त्याला 75 मिलियन डॉलर्स (सुमारे 621 कोटी रुपये) मिळणार आहेत. विशेष म्हणजे, रोनोल्डोला मिळणारे मानधन हे जगातील कोणत्याही खेळाडूपेक्षा सर्वात जास्त मानधन आहे. दोनच दिवसापूर्वी रोनाल्डो खेळत असलेल्या अल नासरने क्लबने अरब क्लब चॅम्पियन्सचे जेतेपद पटकावले आहे.
दिग्गज खेळाडूंची सौदीच्या दिशेने वाटचाल
गेल्या काही वर्षांत फुटबॉल विश्वातील दिग्गज खेळाडूंनी सौदीची वाट धरली आहे. सौदीतील उद्योगपती, राजकारणी व अन्य प्रतिष्ठित अशा क्लबकडून खेळण्यासाठी खेळाडूंवर पैशांचा वर्षाव केला जातो. नेमार, ख्रिस्तियानो रोनाल्डो, सादियो, करीम बेंजेमा यांसह आणखी काही खेळाडूंनी सौदीची वाट धरली आहे. याशिवाय, फ्रान्सचा स्टार खेळाडू एम्बापेही लवकरच सौदीतील एका क्लबशी करारबद्ध होण्याची माहिती आहे.









