वृत्तसंस्था/ पॅरिस
ऑगस्ट, 2026 मध्ये होणाऱ्या पुढील बॅडमिंटन जागतिक अजिंक्यपद स्पर्धेचे यजमान शहर म्हणून नवी दिल्लीची निवड करण्यात आली आहे. तशी घोषणा जागतिक बॅडमिंटन महासंघाने सोमवारी केली. जागतिक बॅडमिंटन महासंघाची ही सर्वांत प्रतिष्ठित स्पर्धा 17 वर्षांनंतर भारतात परतणार आहे. 2009 मध्ये हैदराबादने पहिल्यांदा ही स्पर्धा आयोजित केली होती.
पॅरिसमध्ये यंदाच्या स्पर्धेच्या समारोप समारंभात ही घोषणा करण्यात आली. तिथे महासंघाचे अध्यक्ष खुनयिंग पटामा लीस्वदत्रकुल, फ्रँकाइज दि बॅडमिंटन फेडरेशनचे प्रमुख फ्रँक लॉरेंट आणि बॅडमिंटन असोसिएशन ऑफ इंडियाचे सरचिटणीस संजय मिश्रा यांच्यात हस्तांतरण झाले. मिश्रा यांनी आश्वासन दिले की, देश पॅरिसने दाखवलेल्या उत्कृष्टतेचे आणि भव्यतेचे मानक पुढे नेईल.
‘आम्ही खात्री देतो की, पॅरिसने दाखवलेल्या उत्कृष्टतेला आणि भव्यतेला राखण्यासाठी आणि पुढे नेण्यासाठी भारत 100 टक्क्यांपेक्षा कमी प्रयत्न करणार नाही. आम्ही बॅडमिंटन परिवाराचे दिल्लीत स्वागत करण्यास उत्सुक आहोत’, असे मिश्रा यांनी सांगितले. दिल्लीच्या माध्यमातून स्पर्धा काही वर्षांच्या अंतराने आशियात परतत आहे. 2018 मध्ये चीनमधील नानजिंग येथे ही स्पर्धा आयोजित केली होती. ‘भारतासाठी स्पर्धेचे आयोजन पुन्हा एकदा कोर्टवरील पॉवरहाऊस आणि जागतिक बॅडमिंटन नकाशावरील एक प्रमुख ठिकाण म्हणून त्याचे स्थान अधोरेखित करते’, असे ‘बीएआय’ने पुढे म्हटले आहे.
या स्पर्धेत कोपनहेगनमध्ये प्रकाश पदुकोण यांनी मिळविलेल्या कांस्यपदकाने देशाची प्रगती सुरू झाली, तर 2011 मध्ये ज्वाला गुट्टा आणि अश्विनी पोनप्पा या दुहेरीतील पहिल्या भारतीय विजेत्या ठरल्या, ज्यामुळे देशाच्या अष्टपैलू प्रगतीचे संकेत मिळाले. मात्र आघाडीवर पी. व्ही. सिंधू आहे. ती स्पर्धेच्या इतिहासातील सर्वांत यशस्वी महिला एकेरीच्या खेळाडूंपैकी एक आहे. तिने पाच पदके जिंकली आहेत. त्यात एक सुवर्ण, दोन रौप्य आणि दोन कांस्यपदके आहेत.
या स्पर्धेत 2011 पासून भारताची पदकांची मालिका अखंड सुरू आहे, ज्याचा विस्तार अलीकडेच सात्विकसाईराज रान्कीरे•ाr आणि चिराग शेट्टी यांनी पॅरिस, 2025 मध्ये कांस्यपदकाची कमाई करून केला. या स्पर्धेतील हे त्यांचे दुसरे पदक होते. 2009 मध्ये हैदराबादमध्ये भारताने पहिल्यांदा जागतिक स्पर्धेचे आयोजन केल्यानंतर एका दशकाने 2019 मध्ये बासेलमध्ये सिंधू नोझोमी ओकुहाराला मागे टाकत जागतिक अजिंक्यपद स्पर्धेतील भारताची पहिली सुवर्णपदक विजेती बनली होती. यादरम्यान सायना नेहवालनेही 2015 मध्ये रौप्य आणि 2017 मध्ये कांस्य अशी दोन पदके दिली.









