नऊ सप्टेम्बरला उपराष्ट्रपतीपदाची निवडणूक होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकरता ही निवडणूक म्हणजे ‘दुष्काळात तेरावा महिना’च दिसत आहे. जगदीप धनखड यांना तडकाफडकी घरचा रस्ता दाखवून मोदींनी ही निवडणूक ओढवून घेतलेली आहे. घटनाच अशा वेगाने घडल्या की पंतप्रधानांच्या हाती धनखड यांचा राजीनामा मागण्याशिवाय काही शिल्लकच उरले नव्हते. अजूनपर्यंत धनखड यांनी अळीमिळी गुप चिळी पाळून आपल्या राजीनाम्याचे गूढ अजूनच वाढवलेले आहे. राजीनामा देऊन 10-12 दिवस नाही झाले तेव्हढ्यात देश धनखड यांना विसरला आहे यावरून किती कचकड्याचा माणूस एव्हढ्या उच्चपदी मोदींनी बसवला होता ते देखील प्रकर्षाने दिसून येत आहे.
पश्चिम बंगालचे राज्यपाल म्हणून मोदींचे भाट म्हणून काम करत तेथील मुख्यमंत्री ममता
बॅनर्जी यांना सळो की पळो करून सोडणाऱ्या धनखड यांची राजकीय सद्दी संपली याबाबत कोणीही रडणारे नाही पण त्यांचा उत्तराधिकारी कोणाला बनवावयाचे याबाबत ठरवताना मोदी तसेच गृहमंत्री अमित शहा यांचा घाम निघत आहे असे दिसत आहे. ‘एक मोदी सब पे भारी’ असे गर्वाने ज्यांच्याविषयी त्यांचे समर्थक आणि भक्तमंडळी म्हणायची ते कणखर पंतप्रधान आता कोठे गायब झालेले आहेत. रात्रंदिवस भारताच्या नावाने गेले दोन महिने खडे फोडत असलेल्या अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मोदींची प्रतिमाच डागाळवलेली आहे. तऱ्हेवाईक ट्रम्प यांनी एव्हढे सारे हल्ले करून देखील मोदींनी ट्रम्प यांचे नावदेखील न घेऊन एक अस्वस्थतेचा संदेश दिलेला आहे. लोकसभेत ट्रम्प यांचे नाव घ्या असे त्यांना विरोधकांनी आव्हान दिले तेव्हा तसे न करता पाणी पिऊन वेळ मारून नेणारे पंतप्रधान जगाने बघितले आहेत.
अशा बदललेल्या दिवसात उपराष्ट्रपती बदलवण्याचे कष्टप्रद काम मोदी आणि शहा यांना येत्या पंधरवड्यात करावे लागत आहे. आणि यातच भरपूर गोची आहे. मोदी-शहा यांची परीक्षा आहे. सारे पापग्रह त्यांच्या कुंडलीत जमा झालेले आहेत, असेच जणू दिसत आहे. देशात अथवा बाहेर बघितले तर ‘एखादी तरी स्मितरेषा’ दिसत नाही आहे. तिसऱ्यांदा पंतप्रधान बनून मोदींना 14 महिने उलटले असूनदेखील भाजपचा नवीन अध्यक्ष बनवण्यात ते अजून यशस्वी ठरलेले नसल्याने त्यांच्यामध्ये आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघात काहीतरी गंभीरपणे बिनसलेले आहे, अशी चर्चा राजकीय वर्तुळात वाढीस लागलेली आहे. चार महिन्यांपूर्वी नागपूरला पंतप्रधान झाल्यापासून पहिली भेट देऊन मोदींनी संघाशी सुसंवाद साधण्यास सुरुवात केली होती. त्यानंतर सरसंघचालक मोहन भागवत देखील दिल्लीला मोदींना भेटलेले होते. एव्हढे सारे होऊनदेखील जे. पी. न•ा यांचा उत्तराधिकारी कोण असावा याबाबत उभा राहिलेला पेच अतिशय बोलका आहे. पक्षाध्यक्ष पदाबाबत कोणीच काही बोलत नसल्याने हे गूढ वाढले नसते तर नवल होते. सध्याचे सुरु असलेले संसदेचे पावसाळी अधिवेशन संपले की नवीन अध्यक्ष निवडला जाईल अशी मोघम डेडलाईन दिली जात आहे. असे वारंवार घडलेले आहे.
खरेतर मोदींना पक्ष आणि सरकारात अमूल्य परिवर्तन करून पक्षाला नवीन आव्हानांना तोंड देण्यासाठी सज्ज करावयाचे आहे, असे बराच काळ सांगितले जात असले तरी हा मुहूर्त का बरे लागत नाही आणि तो केव्हा एकदा लागणार याबाबत अनभिज्ञताच दिसून येत आहे. सुब्रमण्यम स्वामी यांच्यासारखे पक्षातील असंतुष्ट तर पुढील महिन्यात 75 पूर्ण करणारे मोदी पंतप्रधानपदावरून पायउतार झाल्याशिवाय भाजपचे सुगीचे दिवस परतणार नाहीत, असे वारंवार दावे करत आहेत. मोदी समर्थक स्वामींपासून दोन हात दूर राहणेच पसंत करतात कारण ते नवीन वाद उत्पन्न करतील, अशी त्यांना भीती वाटते. 80 पार केले असले तरी स्वामी यांच्या अंगात लढण्याची रग आहे आणि त्यांच्यासारखे नेते संघाला मोदी-शहांबद्दल नेहमी सावध करत असतात. जोपर्यंत भाजपला नवीन अध्यक्ष मिळत नाही तोवर मोदी-शहा आणि संघ यांच्यामध्ये सारे सुरळीत झाले आहे असे मानणे शहाणपणाचे ठरणार नाही, असे जाणकार मानतात.
अशामुळेच उपराष्ट्रपतीपदाचे उमेदवार म्हणून ज्यांची नावे पुढे येत आहेत त्यात शेषाद्री चारी सारख्या जुन्या भाजप नेत्याचे नाव देखील आहे. मोदी पंतप्रधान झाल्यापासून चारी हे दिल्लीतून गायब झालेले आहेत आणि ते मुंबईत राहतात. अस्खलित मराठी बोलणारे चारी हे चीनवरील तज्ञ मानले जातात. धनखड तसेच नुकतेच निधन पावलेले जम्मू आणि काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांच्याशी ज्या प्रकारे भाजपने वर्तन केले त्याने उत्तरेकडील वजनदार असा जात समाज दुरावलेला आहे. त्याला आपलेसे करण्यासाठी हरयाणाचे माजी मुख्यमंत्री कैलासवासी बन्सीलाल यांची सून किरण चौधरी यांचे नावदेखील पुढे येत आहे. गेल्यावर्षी काँग्रेसमधून भाजपमध्ये आलेल्या चौधरी या राज्यसभेच्या सदस्य आहेत.
बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार, दिल्लीचे उपराज्यपाल व्ही. के. सक्सेना, भारत रत्न कर्पुरी ठाकूर यांचे पुत्र रामनाथ सिंग ठाकूर, जम्मू आणि काश्मीरचे उपराज्यपाल मनोज सिन्हा, बिहारचे राज्यपाल अरिफ मोहम्मद खान अशा बऱ्याच जणांची नावे याबाबत घेतली जात आहेत. काँग्रेसला अडचणीत आणण्यासाठी शशी थरूर यांचे नावदेखील चर्चेत आणले जात आहे. सत्ताधारी रालोआने पंतप्रधान तसेच भाजप अध्यक्ष जे. पी. न•ा यांना उमेदवार निवडण्यासाठी सर्वानुमती दिलेली आहे. गमतीची गोष्ट अशी की न•ा तसेच राजनाथ सिंग यांची नावेदेखील धनखड यांचा उत्तराधिकारी म्हणून घेतली जात आहेत. लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांनी आपली स्वामीभक्ती गेल्या सहा वर्षात दाखवलेली आहे. कमी गवत खाणारी आणि जास्त दूध देणारी गाय सर्वांना हवी असते. राजकारणातही तसेच आहे. प्रस्थापित नेतृत्वाला राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती पदांवर होयबा आवडतात. पंतप्रधान जे म्हणतील ते काम बिनबोभाट करणारा हरकाम्या त्यांना हवा असतो. विरोधकांना बोलण्याची संधीच न देऊन त्यांना सळो की पळो करण्याचे काम धनखड यांनी चोख केले होते पण आपण उपराष्ट्रपती आहोत. प्रोटोकॉलमध्ये पंतप्रधानाच्या वरचे आहोत. आपला अजेन्डा देखील चालला पाहिजे असा त्यांचा गैरसमज झाला आणि त्यांचा घात झाला. ‘सब का मालिक एक’ हे ते विसरले.
पुढील पंधरवड्यात रालोआच्या उपराष्ट्रपतीपदाच्या उमेदवाराचे नाव ठरणार आहे. त्यामुळे येत्या काळात पंतप्रधानांना बरीच कसरत करावी लागणार आहे. ‘ते ठरवतील आणि इतर टाळ्या वाजवतील’ अशी स्थिती आता राहिलेली नाही. ती होती तेव्हा रबर स्टॅम्प मानले गेलेले रामनाथ कोविंद यांना राष्ट्रपती बनवून त्यांना सर्वांना आश्चर्यचकीत करण्यात यश आलेले होते. आता चंद्राबाबू नायडू आणि नितीश कुमार यांचे मत आजमावूनच पुढील काय ते ठरवावे लागणार आहे. जर भाजपचा अध्यक्ष लवकरच ठरला तर त्यावरून उपराष्ट्रपतीपदाचा उमेदवार ठरवणे किती कठीण अथवा सुकर जाणार आहे याचा अंदाज येणार आहे.
धनखड यांच्यामुळे तोंड पोळलेल्या पंतप्रधानांना आपला विश्वासू नेता उपराष्ट्रपती बनवावयाचा आहे तर नवीन परिस्थितीत आपल्याला एकनिष्ठ असणाऱ्याला संधी देण्यावर संघाचा भर राहणार आहे. या दोन्हीची सांगड घालणारा नेता जो कोणी असेल त्याचे भाग्य फळफळेल. डोनाल्ड ट्रम्प यांच्या दिवसरात्र धमक्या आणि त्यांनी भारताच्या मालावर लावलेला 50 टक्के एव्हढा अतिप्रचंड कर याने मोदी सरकारपुढे आत्तापर्यंतचे सर्वात मोठे संकट उभे केलेले आहे. याचा परिणाम राजकीय क्षेत्रावरदेखील होणार आहे, हे नि:संशय. ही संधी साधून पक्षातील आणि बाहेरचे सारेच कोपराने खणण्याचा प्रयत्न करतील. मोदी हे पूर्वीसारखे खणखणीत नाणे आहे की नाही हे पुढील उपराष्ट्रपतीपदाचा उमेदवार तसेच भाजप अध्यक्ष कोण आणि कसा ठरणार त्यावरून दिसणार आहे. रात्र वैऱ्याची आहे.
सुनील गाताडे








