छत्तीसगड, राजस्थान, मध्यप्रदेशमधील उमेदवार घोषित : राजनांदगावतून रमणसिंह तर शिवराजसिंह बुधनी येथून लढणार
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकीची घोषणा होताच भाजपने सोमवार, 9 ऑक्टोबर रोजी छत्तीसगड, राजस्थान आणि मध्यप्रदेशची पुढील उमेदवार यादी जाहीर केली. भाजपने राजस्थानमधील 41 उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. तर छत्तीसगडमध्ये 64 आणि मध्यप्रदेशमध्ये 57 उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली आहे. छत्तीसगडसाठी भाजपची ही दुसरी आणि मध्यप्रदेशसाठी तिसरी यादी आहे.
छत्तीसगडमधील राजनांदगाव मतदारसंघातून माजी मुख्यमंत्री रमणसिंह यांना तिकीट देण्यात आले आहे. मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांना मध्यप्रदेशातील बुधनी येथून तिकीट देण्यात आले आहे. दतियामधून गृहमंत्री नरोत्तम मिश्रा यांना उमेदवारी देण्यात आली आहे. राजस्थानच्या विद्यानगरमधून खासदार दिया कुमारी यांना तिकीट देण्यात आले आहे. राज्यसभेचे खासदार किरोडीलाल मीना यांना सवाई माधोपूरमधून तिकीट देण्यात आले आहे. खासदार भगीरथ चौधरी, बालकनाथ, नरेंद्र कुमार आणि देवजी पटेल यांनाही तिकीट देण्यात आले आहे. जयपूरमधून राज्यवर्धन सिंह राठोड यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
राजस्थान विधानसभा निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर भाजपने पहिली यादी जाहीर केली आहे. या यादीत भारतीय जनता पक्षाकडून 41 उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली असून सर्वात मोठी बाब म्हणजे या यादीत स्थानिक नेत्यांना प्राधान्य देण्यात आले आहे. पक्षाने आपले खासदारही उभे केले आहेत. राजस्थानमध्ये विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने सात खासदारांना तिकीट दिले आहे. झोटवाडामधून राज्यवर्धन राठोड यांना भाजपने उमेदवारी दिली आहे. तर मांडवा येथून खासदार नरेंद्र कुमार यांना उमेदवारी देण्यात आली. तसेच जयपूरच्या विद्याधरनगरमधून दिया कुमारी, सवाई माधोपूरमधून किरोरी लाल मीना, अलवर तिजारा येथून बाबा बालकनाथ, अजमेर किशनगडमधून भगीरथ चौधरी आणि सांचोरमधून देवजी पटेल यांना तिकीट देण्यात आले आहे. या यादीत मुख्यमंत्रीपदाचे दावेदार मानले जाणाऱ्या अनेक नावांचा समावेश आहे.









